घरमहाराष्ट्रयूपीएच्या अध्यक्षपदात रस नाही! शरद पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना पूर्णविराम

यूपीएच्या अध्यक्षपदात रस नाही! शरद पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना पूर्णविराम

Subscribe

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यापासून भाजपला पर्याय ठरू शकेल अशी काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी उभारण्यावर देशभरातील विरोधकांमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यातच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे अध्यक्षपद काँग्रेसकडून काढून घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ते सोपवण्यात यावे, अशी मागणीही काही दिवसांपासून होत आहे.

राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने पवारांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा ठराव केल्यापासून तर या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना यूपीएच्या अध्यक्षपदात मला अजिबात रस नाही, असे म्हणत शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत देशातील सर्व विरोधकांची एकजूट करण्यासाठी गरज भासल्यास सर्वतोपरी मदत करण्याची तयारी असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यूपीएचे अध्यक्षपद काँग्रेसकडे म्हणजे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

- Advertisement -

कोल्हापूर येथे रविवारी पत्रकारांशी गप्पा मारताना पवारांनी हा खुलासा केला. ते म्हणाले, यूपीएच्या अध्यक्षपदात मला अजिबात रस नाही. राष्ट्रवादीच्या युवक आघाडीतील काही तरुणांनी तसा ठराव केला. परंतु मला त्यात यत्किंचितही रस नाही. मी त्याच्यात पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य, शक्ती, पाठिंबा, मदत देण्यासाठी माझी तयारी आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

विरोधी पक्षाने एकत्र यावे असे म्हटले जाते. पण त्यातील वास्तव दुर्लक्षित करून चालणार नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये शक्तीशाली आहे. त्या सत्तेत असून त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. बाकीच्या पक्षांचीही राज्या राज्यात शक्तिकेंद्र आहेत. आज भलेही काँग्रेस सत्तेत नसेल पण देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात काँग्रेसचे अस्तित्व कमी जास्त प्रमाणात आहे. तो पक्ष व्यापक आहे. सर्वत्र काँग्रेस कार्यकर्ते आहेत. त्या पक्षाला घेऊन पर्यायी काही करायचे असेल तर ते वास्तवाला धरून होईल. आमचे मित्रपक्ष काही करत असेल तर त्यातून चांगले निर्माण होईल, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

पुतिन होऊ नये ही अपेक्षा
देशात शक्तीशाली विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी विविध पक्ष हवे असतात. एकच पक्ष असला की मग ते पुतीनसारखे होईल. रशियाने ठराव केला, चीनने केला. असे पुतिन होऊ नये ही अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.

दोन चार महिने भूमिगत होतात
यापूर्वी ते मोदींच्या संदर्भातील काय काय भूमिका मांडत होते ते महाराष्ट्राने पाहिले. आज मोदींना अनुकूल अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेत सातत्य नसते हे वारंवार दिसून आले आहे. त्यांचे वैशिष्ठ्य सांगायचे म्हणजे, ते दोन चार महिने भूमिगत होतात आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन चार महिने ते काय करतात ते मला माहीत नाही, असा चिमटा शरद पवार यांनी राज ठाकरेंना काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -