घरमहाराष्ट्रशरद पवार पुन्हा पावसात भिजले, एकच फोटो तिघांनी केला शेअर अन् म्हटले...

शरद पवार पुन्हा पावसात भिजले, एकच फोटो तिघांनी केला शेअर अन् म्हटले…

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्याच्या सभेत पावसात केलेल्या प्रचाराची जोरदार चर्चा रंगली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर पुन्हा पक्षउभारणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. ते महाराष्ट्र दौरा करत असून त्याची सुरुवात आज, शनिवारी नाशिकमधील सभेने होत आहे. तिथे कार्यकर्त्यांना पावसात भेटल्यानंतर गाडीत बसत असतानाचा फोटो राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांनी शेअर करत अजित पवार गटाचे आव्हान स्वीकारल्याचे सूचक कॅप्शन दिले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या अन्य आठ दिग्गज मंत्र्यांनीही शपथ घेतली. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा हादरा होता. पण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे आव्हान स्वीकारून पुन्हा पक्षउभारणीसाठी राज्यव्यापी दौरा करण्याचे ठरविले. त्याची सुरुवात आज, शनिवारी नाशिकच्या येवल्या येथील सभेपासून होत आहे. येवला हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि भुजबळ हे अजित पवारांच्या छावणीत डेरेदाखल झाले आहेत.

- Advertisement -

मुंबईहून सकाळी नाशिककडे जात असताना ठाण्यासह अनेक ठिकाणी शरद पवार यांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. नाशिकमध्येही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान पावसात भिजलेल्या शरद पवार यांचा फोटो त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार तसेच विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. ‘भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं, ना थका हूँ ना हारा हूँ… रण में अटल तक खडा हूँ मैं…’ असे कॅप्शन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तर, ‘मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ… शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे…’ असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ‘तेरे हर एक वार का पलटवार हूं…’ असे कॅप्शन दिले आहे.

साताऱ्याच्या सभेतही भिजले होते पवार
सन 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भरपावसात उभे राहून भाषण केले होते. त्याचा फोटो खूप व्हायरल झाला होता आणि नेटिझन्सकडून त्यांचे खूप कौतुक झाले होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -