घरमहाराष्ट्रनाशिकपवारांना पाठबळ की भुजबळ; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, प्रमुख पदाधिकारी 'आउटऑफ कव्हरेज'

पवारांना पाठबळ की भुजबळ; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, प्रमुख पदाधिकारी ‘आउटऑफ कव्हरेज’

Subscribe

नाशिक : केंद्र, राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरणारया राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वात बंड करत भाजप शिंदे गटाशी हातमिळवणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला या बंडाला पाठींबा नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांची नवी फळी उभी करण्याचे सुतोवाच केले. राज्यात या घडामोंडींनतर सर्वत्र राष्ट्रवादीने बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने केली. मात्र नाशिकयेथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात मात्र शुकशुकाट दिसून आला. नाशिक राष्ट्रवादीने ना जल्लोष केला ना आंदोलन केले. पवारांना पाठबळ द्यावे की भुजबळांना असा संभ्रम पदाधिकार्‍यांमध्ये दिसून आला.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे ६ आमदार असून त्यातील पाच आमदार अजितदादांचे समर्थक मानले जातात. दुसरीकडे, ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ यांची ओळख आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि भुजबळ हे एक समीकरणच बनले आहे. जिथे भुजबळ तिथे पक्ष अशी एकूणच स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेतांना यात भुजबळांची भूमिका महत्वाची मानली जाते. आजच्या राजकीय घडामोडींनंतर भुजबळांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यासह इतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथ घेतली. यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या प्रतिमेला काळे फासले. राज्यात आंदोलन सुरू असतांना नाशिक राष्ट्रवादीमध्ये मात्र शुकशुकाट दिसून आला. मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन कार्यालय रविवार असल्याने बंद होते मात्र या घडामोडींनंतर एकही पदाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही त्यामुळे नाशिकमध्ये ना जल्लोष करण्यात आला ना आंदोलन. नाशिक राष्ट्रवादीवर भुजबळांची मजबुत पकड आहे त्यामुळे भुजबळांना समर्थन द्यावे की, पवारांसोबत जावे असा संभ्रम काही पदाधिकारयांना पडल्याने अनेकांनी याबाबत मौन धारण केल्याचेच दिसून आले.

- Advertisement -

आमदारांच्या भूमिका गुलदस्त्यात

रविवारच्या मंत्रीमंडळ शपथविधीप्रसंगी भुजबळ, अजित पवारांसह आ. नरहरी झिरवाळ उपस्थित होते. तर पाठींब्याच्या पत्रावर आमदार सरोज अहिरे यांची स्वाक्षरी आहे. मात्र आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर यांची भूमिका स्पष्ट होउ शकले नाही. अर्थात हे तिनही आमदार अजित पवारांचे समर्थक मानले जातात. असे असले तरी आजच्या घडमोडींबाबत या आमदारांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कोणी नॉट रिचेबल होते तर कुणी प्रतिसाद दिला नाही. तर पक्षाच्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांनीही याबाबत बोलणे टाळले.

भुजबळ समर्थक मुंबईत

जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांना रविवारी (दि.२) सकाळीच मुंबईकडे दाखल होण्याचा निरोप भुजबळांच्या कार्यालयाकडून मिळालेला होता. त्यामुळे सकाळपासूनच हे समर्थक मुंबईत दाखल होत होते. भुजबळांच्या शपथविधीला अनेक समर्थक हजर होते. याबाबत काही समर्थकांशी संपर्क साधला असता, जेथे भुजबळ तेथे आम्ही अशी भूमिका माय महानगरशी बोलताना व्यक्त केली.

- Advertisement -

खोके आंदोलन करणाऱ्यांचे फोन बंद 

दोनच दिवसांपूर्वी सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करत पन्नास खोके, एकदम ओक्के च्या घोषणा देण्यात आल्या. यापूर्वीही सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विविध आंदोलने केली.मात्र आता त्याच सरकारसोबत सत्तेची चुल मांडल्याने आता माध्यमांच्या प्रश्नांनी कशी उत्तरे द्यावी या धास्तीने अनेकांनी आपले मोबाईल फोन बंद केल्याचे दिसून आले. तर काहीजण नॉटरिचेबल दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -