घरमहाराष्ट्रसीएएला घाबरण्याची गरज नाही

सीएएला घाबरण्याची गरज नाही

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे दिल्लीत स्पष्टीकरण

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी दिल्ली दौर्‍यावर होते. त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. सुमारे दीड तास झालेल्या या चर्चेत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. पंतप्रधानांना भेटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, मी अनेक वेळा दिल्लीत आलो होतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी त्यांना भेटायला आलो.

- Advertisement -

भेटीत खूप चांगली चर्चा झाली. महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. राजकारण बाजूला ठेऊन केंद्राचे सहकार्य राज्याला मिळावं असं मी त्यांना सांगितलं. त्यांनीही सहकार्य करू असे सांगितले. सीएए, एनआरपीबाबत देखील चर्चा केली. या सगळ्याबद्दल मी आगोदरच माझी भूमिका सांगितली आहे. विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली. सीएएबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याची गरज नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या भेटीत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा केली. सीएए हा कायदा कुणाला देशातून काढण्यासाठी झालेला नाही. शेजारच्या राष्ट्रातील हिंदू बांधवांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. एनआरपी अर्थात देशात जनगणना होणे आवश्यक आहे. एनपीआर कुणालाही देशातून बाहेर काढण्यासाठी नाही. लोकसंख्या मोजण्यासाठी दर 10 वर्षांनी होते. त्यामुळे त्यात काही आक्षेपार्ह आढळलं तर तेव्हा नक्कीच आक्षेप घेऊ, तर एनआरसी देशात लागू होणार नाही. तो केवळ आसामपर्यंत मर्यादित राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आंदोलन करणार्‍यांना ज्यांनी भडकावले आहे त्यांनी हा कायदा समजून घेण्याची गरज आहे. जीएसटीचा पैसा येत आहे, मात्र ज्या वेगात यायला हवा त्या वेगात येत नाही. शेतकरी विम्याबाबतही चर्चा केली. जीएसटीचे पैसे येत आहेत. मध्ये मी पत्र लिहिले तेव्हा काही पैसे आले आहेत. मात्र, हे पैसे येण्याचा वेग वाढायला हवा. आम्ही शेतकर्‍यांसाठी योजना आणत आहोत. त्यासाठी पैसा लागणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याशी संबंधित ज्या काही आवश्यक गोष्टी आहे त्यावर चर्चा झाली. राजकीय घडामोडी एकीकडे मात्र राज्यासाठी केंद्राचा पाठिंबा हवा, असे मोदींना सांगितले. त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले. राज्य आणि केंद्र समन्वयातच सगळ्या गोष्टी आल्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या बैठकीत सीएए, एनपीआर आणि एनआरसीवर चर्चा झाली अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. मी सीएए, एनपीआर, एनआरसीबाबत ‘सामना’त माझी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘सीएए’ला घाबरायची गरज नाही. एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. मी माझ्या राज्यातील नागरिकांना आश्वासन दिले आहे की कुणाचाही अधिकार हिरावून घेतला जाणार नाही. जे मला माहीत आहे ते मी बोलत आहे. एनआरसीमुळे फक्त मुस्लमांसाठी नाही तर सगळ्यांनाच लायनीत उभे रहावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यपालांशी मतभेद नाहीत
महाविकास आघाडीच्या सरपंच निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी परत पाठवला, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, महाराष्ट्रातल्या प्रश्नांना महाराष्ट्रात उत्तर दिलेले आहे. राज्यपालांशी कोणतेही मतभेद नाहीत. लगेच चित्र निर्माण केले जात आहे की, राज्यपाल आणि सरकार यात अधिवेशनाची ठिणगी पडली, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -