घर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी स्वतःही आरशात पाहायला हवे, कळवा रुग्णमृत्यू प्रकरणी ठाकरे गटाने सुनावले

मुख्यमंत्र्यांनी स्वतःही आरशात पाहायला हवे, कळवा रुग्णमृत्यू प्रकरणी ठाकरे गटाने सुनावले

Subscribe

मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्युकांड सुन्न करणारे तर आहेच, पण शिंदे सरकारच्या काळात संपूर्ण राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर गेल्याचा ढळढळीत पुरावा आहे. टविरोधकांनी या घटनेचे राजकारण तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नये,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अर्थात हे बोलताना त्यांनी स्वतःही आरशात पाहायला हवे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे.

मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यांच्या नावाने तुमचे सरकार भंपक राजकारण करीत आहे, खोटे गुन्हे दाखल करीत आहे. कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत झालेल्या 18 मृत्यूंवर विरोधकांनी आवाज उठविला, त्यावरून सरकारला धारेवर धरले तर त्याला राजकारण कसे म्हणता येईल? मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून तुम्ही खोटी राळ उडवायची आणि कळवा रुग्णालयातील जीवघेण्या ‘सत्या’बाबत विरोधकांनी त्यांचे कर्तव्यही पार पाडायचे नाही. हलगर्जीपणामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा ‘आवाज’ बनायचे नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

जनतेच्या मदतीला धावून जात असल्याचे नाटक करू नका
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी (13 ऑगस्ट) एका रात्रीत या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्युकांडाने महाराष्ट्राला हादरे बसले, पण ठाणे-कळवा ज्यांचे ‘होम ग्राऊंड’ आहे त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते जाणवायला बहुदा दोन दिवस लागले. सोमवारी रात्री त्यांचे पाय कळवा रुग्णालयाला लागले. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते म्हणे महाबळेश्वर येथे आराम घेत होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीस जपा, हवा तिथे, हवा तेवढा आराम करा, पण आपण जनतेच्या मदतीला कसे लगेच धावून जातो याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका. ज्या हेलिकॉप्टरने मदतीच्या ठिकाणी तत्काळ गेल्याचे तुम्ही भासविता त्याच हेलिकॉप्टरने महाबळेश्वर येथून कळवा येथे यायला तुम्हाला किती वेळ लागला असता? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

कारवायांची तात्पुरती मलमपट्टी
नेहमीप्रमाणे त्यांनी उच्चस्तरीय वगैरे चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने 10 दिवसांत अहवाल द्यावा, असेही सांगितले. सध्याच्या राज्यकर्त्यांचे हे एक ‘रुटिन’ कर्तव्य बनले आहे, तेच त्यांनी पार पाडले. आरोग्य व्यवस्थेसंदर्भात अशा अनेक चौकशी समित्या आल्या आणि गेल्या. त्यातील बहुतेक अहवाल धूळ खात पडले आहेत. या समित्या अनेकदा सरकारी धूळफेकच असते. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाबाबतही मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा वेगळे काही केलेले नाही. बरे, 10 दिवसांनी खरेच चौकशी अहवाल आला आणि त्यानुसार एक-दोघांच्या बदल्या, निलंबन अशा कारवायांची तात्पुरती मलमपट्टी झालीच, तरी कळवा रुग्णालय काय किंवा राज्यातील इतर सार्वजनिक आरोग्य यंत्रणा काय, तेथील दुरवस्थेत काय मोठा आमूलाग्र बदल होणार आहे? अशी विचारणा या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा
मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्यमंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. तेव्हा विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचे कान उपटावेत. 1986 मध्ये जे.जे. रुग्णालयातील 14 मृत्यूंवरून तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत यांनी राजीनामा दिला होता. ते मृत्यू दोन महिन्यांतील होते. कळवा रुग्णालयातील 18 मृत्यू 24 तासांतील आहेत. त्यामुळे आताच्या ‘सावंतां’नीही राजीनामा द्यायला हवा. ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करायला हवे. कारण प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

जनतेला मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल
शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय आरोग्यदेखील बिघडलेलेच आहे. ते आणखी बिघडावे यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रयत्न सुरू आहेत. ते सुधारण्यासाठी जनतेलाच 2024 मध्ये मोठी ‘शस्त्रक्रिया’ करावी लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही चौकशी समिती, तिचा अहवाल आणि कारवाई वगैरेच्या वाफा सोडत राहा, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -