घरमहाराष्ट्रशेकापसाठी धोक्याची घंटा

शेकापसाठी धोक्याची घंटा

Subscribe

नव्या समीकरणाची शक्यता

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा न मिळाल्याने पक्षासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवलेले सूत तकलादू होते की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे. आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्या राजकीय समिकरणाची शक्यता समोर येत आहे.

शेकापला त्यांचा बालेकिल्ला असलेल्या अलिबागसह पेणमध्ये झालेला पराभव जिव्हारी लागलेला आहे. अलिबागमधून आमदार पंडित पाटील यांचा शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी केलेला पराभव शेकापला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. 2009 मध्ये शेकापच्या विजयी उमेदवार मीनाक्षी पाटील यांना ९३ हजार १९७ मते मिळाली होती. २०१४ मध्ये मात्र शेकापचा विजय झाला असला तरी मताधिक्य 76 हजार 531 इतक्यावर आले. या निवडणुकीत पंडित पाटील विजयी झाले होते. मतदान घटल्यानंतर शेकापने आत्मपरीक्षण करून 2019 च्या निवडणुकीत उतरणे अपेक्षित असताना हा पक्ष गाफील राहिला आणि शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापला धूळ चारण्याची करामत केली. विविध संस्था, जिल्हा परिषदेतील महत्त्वाची पदे आणि काही मोठे व्यवसाय आपल्या हाती असल्याने विजय साकारू हा विश्वास शेकापला नडला असून, गृहित धरण्याची मनमानी करू नका, असा जणू इशाराच मतदारांनी शेकापला दिला आहे.

- Advertisement -

पेणमध्ये सलग तिसर्‍या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकापच्या धैर्यशील पाटील यांना भाजपच्या रवी पाटील यांनी पराभूत केले. भाजपची ताकद नसताना रवी पाटलांचा करिश्मा मतदारसंघात चालला आणि धैर्यशील पाटील यांची हॅट्ट्रिक जागेवरच राहिली. शेकापला जेथे मतांची अपेक्षा असते त्या भागांतून रवी पाटील यांनी मुसंडी मारत यापुढे या ठिकाणी आपलेच वर्चस्व असेल हे दाखवून दिले. उरणमध्ये शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना दुसर्‍यांदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पनवेलचा शेकापचा बालेकिल्ला यापूर्वीच काँग्रेस आणि नंतर भाजपकडून उद्ध्वस्त झालेला असताना शेजारी उरणही आता हातातून गेल्यात जमा आहे.

रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता नाट्यात शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जवळ आले. शेकापचे जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना भक्कम पाठिंबा दिला. मात्र हे सख्य काही वर्षे तरी टिकेल याची ब्रह्मदेवही खात्री देणार नाही, अशी चर्चा तेव्हाच सुरू झाली होती. शेकापचे जिल्हा परिषद प्रेम सर्वश्रुत असल्याने त्यांनी तटकरे यांच्याशी जुळवून घेतले आणि अडीच वर्षांच्या कालावधीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याकडे घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. परंतु विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकापमध्ये खरोखरच सख्य होते का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सत्तेपासून शेकापला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना जवळ येण्याच्या शक्यतेवर चर्चा झडू लागल्या असून, वेळ पडल्यास अध्यक्षपद शिवसेनेला देण्याच्या हालचाली होऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

- Advertisement -

यावेळी विधानसभेत शेकापचा अवघा एकच आमदार असल्याने सेना-भाजपचे नेते शेकापला महत्त्व देतील अशी तूर्त तरी शक्यता नसल्याने जिल्हा परिषदेत शिवसेना आणि शेकाप एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे. तसा प्रयत्न झालाच तर त्याला स्थानिक शिवसेनेतून मोठा विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हा परिषदेत शेकाप २३, राष्ट्रवादी काँग्रेस 12, शिवसेना 1८, तर काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी ३ असे बलाबल आहे. येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आणि पर्यायाने इतर पदाधिकार्‍यांचीही निवड येईल. विद्यमान अध्यक्ष आदिती तटकरे या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्या तेथून आपोआपच दूर होणार आहेत.

एकमेकांना सोडणार नाही, अशा आणाभाका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापमध्ये सारे काही आलेबल असल्याचे दिसत नाही. विजयाची खात्री असलेल्या कर्जतच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या हॅट्ट्रिकला शेकापच्या असहकारामुळे ब्रेक लागला, अशी खुलेआम चर्चा सुरू झाली असून, तिकडे पेणमध्ये शेकापच्या धैर्यशील पाटील यांचीही हॅट्ट्रिक राष्ट्रवादीच्या असहकारामुळे रोखली गेल्याचे उघडपणे बोलले जात आहे. उरणमध्येही राष्ट्रवादीची विवेक पाटील यांना मदत झाली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हे पक्ष एकमेकांपासून फारकत घेतील, असे तूर्तचे तरी चित्र आहे. याबाबत कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाही.

शेकापसाठी धोक्याची घंटा
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -