घरमहाराष्ट्रमनसेचे तत्काळमध्ये फक्त १ तिकीट कन्फर्म

मनसेचे तत्काळमध्ये फक्त १ तिकीट कन्फर्म

Subscribe

राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेला दावा सफशेल फोल ठरत पुन्हा मनसेच्या उमेदवारांना महाराष्ट्राने नाकारले आहे. मनसेने संपूर्ण राज्यातून दिलेल्या १०४ उमेदवारांपैकी अवघ्या १ उमेदवारालाच यश आले आहे. त्यामुळे मनसेच्या यापुढच्या राजकारणाबाबत आता पुढे काय असा सवाल निर्माण करण्यात येत आहे. मनसेने सर्वात पहिल्यांदा विरोधी पक्षनेत्याचा दावा पुकारत यंदाच्या निवडणुकीत जीव आणला होता. तसेच मनसेच्या उमेदवारांसाठी मुंबई महानगरासह राज्यात अनेक ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला होता. पण मनसैनिकांना मतदानाच्या रूपात मात्र काही विशेष कौल यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मिळाला नाही.

लोकसभेच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक दिवस आपली भूमिका मांडली नाही. त्यापाठोपाठ लागलेल्या ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. पण ईडी चौकशीनंतरही राज ठाकरे यांनी आपले मौन कायम ठेवले. विधानसभा लढवायच्या की नाही असा विचार तळ्यात मळ्यात असतानाच पक्षातील आग्रही गटामुळे त्यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आघाडीमध्ये राज ठाकरे यांना येण्याचा आग्रह तसेच आघाडीचे नेतृत्व करण्याचा आग्रह, ईव्हीएम मशीन विरोधातील आंदोलन यासगळ्या घडामोडींमध्ये राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने एक वेगळा पर्याय राज्यासमोर देऊ केला तो म्हणजे विरोधी पक्षनेता म्हणून निवडून देण्याचा. त्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सभांचा सपाटाही लावला.

- Advertisement -

एकाच दिवसात तीन सभांचा धडाका, प्रत्येक सभेच्या माध्यमातून उमेदवारांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यासगळ्या पार्श्वभूमीवर मनसेला यंदा तरी जनता स्विकारेल अशी आशा राज ठाकरे यांना होती. पण राज ठाकरेंचा विधानसभेचा ट्वेंटी ट्वेंटी फॉरमॅट मात्र जनतेच्या पचनी पडला नाही. त्यामुळेच संपूर्ण राज्यात मनसेच्या उमेदवारांच्या पाठीशी राज ठाकरे सावलीसारखे उभे राहिल्यानंतरही मनसेच्या सभांचे रूपांतर हे विजयामध्ये झाले नाही.

चिंतनाची आवश्यकता

- Advertisement -

आता विधानसभेत मनसेचे इंजिन डिरेल झाल्यानंतर पक्षासाठी यापुढचा नेमका राजकारणाचा ट्रॅक काय असणार, आगामी वर्षांमध्ये पक्षाची वाटचाल यासगळ्या मुद्द्यावर आता मनसेपुढे अनेक प्रश्न निरूत्तर असे आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणातील स्ट्रॅटेजीवर गंभीर विचार मंथनाची आगामी काळात मनसेला तारू शकणार आहे. अन्यथा मनसेचे पक्ष म्हणून तरी अस्तित्व आणखी खोलात जाणार ही बाब अटळ आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -