घरदेश-विदेशदुसर्‍या लग्नासाठी थॉमसने स्वीकारला इस्लाम धर्म

दुसर्‍या लग्नासाठी थॉमसने स्वीकारला इस्लाम धर्म

Subscribe

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा (पीएमसी बँक) निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस याने आपल्या तरुण सेक्रेटरीसोबत लग्न करण्यासाठी २००५ साली इस्लाम धर्म स्वीकारला. ही तरुण सेक्रेटरी त्याच्यासोबत बँकेत काम करत होती. तिच्या नावावर पुण्यात नऊ फ्लॅट असून ४ कोटींची ती मालमत्ता आहे, अशी माहिती थॉमस याच्या पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

जॉय थॉमस हा ४,३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहे. त्याच्यासह एचडीआयएल बँकेचे संचालक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग आणि बँकेचे माजी अध्यक्ष वारियाम सिंग हेही सध्या तुरुंगात आहेत.

- Advertisement -

थॉमसचे लग्न झाले आहे. त्याचे कुटुंबही आहे. पण तरीही त्याचे त्याच्या बँकेतील सेक्रेटरीसोबत सूत जुळले. २००५ साली तिने लग्न होत असल्याने आपण दुबईला शिफ्ट होतोय हे कारण देऊन नोकरी सोडल्याचे बँकेच्या कर्मचार्‍यांना तिच्याविषयी शेवटचे माहीत आहे. तिने लग्नही केले नाही की ती दुबईलाही गेली नाही. ती पुण्याला शिफ्ट झाली. तिचा नवरा, जॉय थॉमस ज्याने दुसरे लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला होता. त्याच्या मुंबई, पुणे अशा वार्‍या सुरू झाल्या, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली.

तिने पुण्यातील मालमत्ता कशी खरेदी केली, याचा आम्ही आता शोध घेत आहोत. जर ही मालमत्ता अनैतिक मार्गाने मिळवली असेल तर आम्ही तिच्या मालमत्तेवर टाच आणू. तिची पुण्यात ४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, असेही तो अधिकारी म्हणाला.

- Advertisement -

चौकशी दरम्यान, आता ६२ वर्षे वय असलेल्या थॉमसने पोलिसांना सांगितले की, इस्लाम स्वीकारल्यानंतर आपण जुनेद हे नवे नाव धारण केले असले तरी आर्थिक आणि सरकारी कागदपत्रांवर त्याने जॉय थॉमस हेच नाव कायम ठेवले. सोयीसाठी त्याने धर्म परिवर्तन केले. थॉमसचे मुंबई आणि ठाण्यात फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट त्याच्या पहिल्या बायकोच्या मुलाच्या नावावर आहे. त्याने आणि त्याच्या दुसर्‍या बायकोने एक मुलगी दत्तक घेतली आहे. ती आता ११ वर्षांची आहे. त्यांना १० वर्षे वयाचा मुलगाही आहे. दुसरी बायको चॉकलेट बनवते आणि विकते, तिचे ब्युटीकही आहे. तसेच पुण्यातील काही मालमत्ता तिने भाड्याने दिल्या असल्यामुळे तिला त्यांचे भाडेही मिळते. थॉमसच्या पहिल्या पत्नीला त्याच्या दुसर्‍या लग्नाबद्दल कळल्यावर तिने घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे.

बँकेतून आता ४० हजार रुपये काढता येणार
पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेधारकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा २५ हजारांहून ४० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमसी बँकेचे खातेधारक आता आपल्या बँक खात्यातून सहा महिन्यात ४० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतील, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. अगोदरची मर्यादा एक हजार, १० हजार आणि २५ हजारांची होती. त्यामुळे ज्यांनी खात्यातून यापूर्वी एक हजार, १० हजार आणि २५ हजार काढले असतील तर त्यांना आता आपल्या खात्यातून फक्त ४ हजार रुपये काढता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -