घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या ५० वाहतूक पोलिसांना मुंबईत दिले जाणार वाहतूक नियमनाचे धडे

नाशिकच्या ५० वाहतूक पोलिसांना मुंबईत दिले जाणार वाहतूक नियमनाचे धडे

Subscribe

नाशिक : शहरातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी व शहरातील वाहतूक नियोजन सुधारण्यासाठी ५० वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले पोलीस शहरातील वाहतुकीला शिस्त लावणार आहेत.

नाशिक शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. परिणामी, प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, मुंबई नाका, द्वारका, इंदिरानगर या तीन चौकांत वाहतुकीची अवस्था विदारक आहे. शहरातील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई सुरु केली आहे. भरधाव वाहनांचा वेग कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील ‘लेन कटिंग’ करणार्‍यांना शिस्त लावण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.

- Advertisement -

लेन कटींग रोखल्यानंतर आता नाशिक-पुणे महामार्गावरही अंमलबजावणी सुरू झाली आहे. दीड महिन्यापूर्वी पोलीस, महापालिका, आरटीओ, न्हाई या संस्थांनी एकत्रित येत शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यावेळी मुंबई नाका सिग्नल अरुंद करून, इंदिरानगर बोगद्यावर ग्रेड सेपरेटर करावा अथवा वाहतूक कोंडीच्या ठिकाणी लहान उड्डाणपूल करावेत, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या होत्या. मात्र, सणोत्सवात आणि नंतरही शहरात सर्वत्रच होणारी वाहतूक कोंडी गंभीर वळणावर पोहोचली आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी प्रशासन कार्य करीत असून, वाहतूक अंमलदारांनाही मुंबईच्या धर्तीवर आता प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांचे सुरू असलेले काम पाहिल्यानंतर प्रशिक्षण घेण्याचा मार्ग आयुक्तालयाने निवडला आहे. त्यानुसार आता वाहतूक पोलीस मुंबईला जाणार आहेत.

नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबई पोलिसांची कार्यपद्धती अभ्यासली जाणार आहे. त्यासाठी मुंबईच्या आयुक्तांशी चर्चा करून ‘टायअप’ केले असून, लवकरच ५० वाहतूक अंमलदार मुंबईत पाठवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांसोबत काम करणार आहेत. प्रशिक्षण घेतल्यावर त्याचा फायदा नाशिकसाठी करून घेण्यात येणार आहे. : जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -