घरमहाराष्ट्रकुत्र्यांचे खाण्यापिण्याचे लाड करा, पण आपल्या घरी; मुंबई हायकोर्टाने सुनावले

कुत्र्यांचे खाण्यापिण्याचे लाड करा, पण आपल्या घरी; मुंबई हायकोर्टाने सुनावले

Subscribe

मुंबई – सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालू नये, असे महत्त्वाचे निर्देश मुंबई उच्च न्यायालायने प्राणीमित्रांना दिले आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी व्हावा याकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे.

२००६ साली नागपूरच्या धंतोली नागरिक मंडळाकडून सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या परिसरात भटक्या कुत्र्यांकडून रहिवाशांना त्रास होत होता. कुत्र्यांचा उच्छाद होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. भटक्या कुत्र्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने सुनावणी घेऊ शकतात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑक्टोबरला दिला. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

- Advertisement -

न्यायमूर्ती सुनिक शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. “प्राणीमित्रांनी भटक्या कुत्र्यांना खुशाल खाऊ घालावे. पण अशा प्रकारची कृती ही फक्त घरीच होऊ शकते. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालता येणार नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीने आधी भटक्या कुत्र्याला अधिकृतरीत्या दत्तक घेऊन त्याची नोंदणी नागपूर महानगर पालिकेकडे करणं बंधनकारक आहे. घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्यास संबंधितांवर दंड आकारण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला असेल”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

दरम्यान, हा आदेश फक्त नागपूर पालिका हद्दीतच लागू आहे. परंतु, अशाच प्रकारची मागणी राज्याच्या इतर भागातूनही होऊ लागली आहे. निकाल देताना न्यायालयाने नागरिकांच्या तक्रारीवरून नागपूर पालिका प्रशासनाला भटक्या कुत्र्यांना पकडून इतर ठिकाणी हलवण्याचा पूर्ण अधिकार असेल, असं स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -