घरमहाराष्ट्रग्रासले बोर्ली ग्रामस्थांना समस्यांचा विळखा !

ग्रासले बोर्ली ग्रामस्थांना समस्यांचा विळखा !

Subscribe

मुरुड तालुक्यातील बोर्ली गट ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना विविध समस्यांनी सध्या ग्रासले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सन १९५८ मध्ये स्थापना झालेल्या व मुरुड तालुक्यातील तिसर्‍या क्रमांकाच्या या ग्रामपंचायत हद्दीत बोर्लीसह कोलमांडला, सुरई, सुरई आदिवासी वाडी आणि ताराबंदर (नवी बोर्ली) चा समावेश आहे. लोकसंख्या साडेचार हजाराच्या आसपास आहे. साळाव-मुरुड मार्गावरून बोर्ली गावात येणार्‍या फाट्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली दूरक्षेत्रपर्यंत असणारा रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत येतो. तेथे असंख्य खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनांसह पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.

12 एप्रिल 2018 रोजी आ. प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बोर्ली फाटा ते बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्याचे काम सुरूच झाले नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला नसल्यामुळे रस्ता झाला नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरूड तालुका सचिव राजेश तरे यांनी सांगितले.मशिदीजवळ लागत असणार्‍या रस्त्यावरील सिमेंट उखळून त्यातून लोखंडी सळ्या बाहेर आल्या असल्याने तेथे अपघाताची भीती आहे. रामवाडी येथील तळा विहिरीवर जाण्यासाठी असणार्‍या रस्त्याच्या मध्यभागी महावितरणने खांब उभारला असल्याने वाहनांना अडथळा होत आहे. तसेच त्या परिसरात कोणी आजारी पडल्यास त्याला झोळीमधून आणावे लागत आहे. विहिरीकडे जाणार्‍या रस्त्यालगत कचर्‍याचे ढिग पडले आहेत. रस्ताही खचलेला आहे. ग्रामपंचायतीची तीनचाकी सायकल सध्या भंगारात गेली आहे.

- Advertisement -

जुना बाजार परिसर, साने गुरुजी विद्यालयालगत समुद्र किनारी, मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ कचरा पसला आहे. त्यामुळे परिसरावर रोगराईचे सावट दाटले आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. पाण्याच्या दोन योजना असूनसुद्धा ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. फणसाड धरणाचे येणारे पाणी पिण्यास योग्य नाही. दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. महावितरणच्या कारभाराचे तीन तेरा वाजल्याने वीज पुरवठा कधीही खंडित होत असतो. त्याचा फटका नागरिकांना बसत असतो. पूर्वी मध्यरात्री गावात येणार्‍या मुरुड आगाराच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्या पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

बोर्ली ग्रामस्थांना भेडसावत असणार्‍या समस्यांबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये रेजगा टाकून ते भरण्यात येतील. महावितरण व एसटीच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकार्‍यांशी बोलून तोडगा काढण्यात येईल.
– नौशाद दळवी, सरपंच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -