घरमहाराष्ट्रपुण्याच्या उपमहापौरांनी रस्त्यावर थुंकणाऱ्याला घडवली अद्दल!

पुण्याच्या उपमहापौरांनी रस्त्यावर थुंकणाऱ्याला घडवली अद्दल!

Subscribe

थुंकणाऱ्या दुचाकी चालकाला वाहनावरून उतरवून उपमहापौरांनी चक्क रस्ता धुवून घेतला. तसेच, पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची सक्त ताकीद देखील दिली. उपमहापौरांच्या या कृतीचे पुणेकरांनी कौतुक केले.

पुणे शहर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. मग त्या पुणेरी पाट्या असोत किंवा हेल्मेट सक्तीचा विषय असो. परंतु सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घटना पुण्यात घडली. पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी गाडीवरून जाणाऱ्या दुचाकी चालकाला रस्त्यावर थुंकताना बघितले आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. थुंकणाऱ्या दुचाकी चालकाला वाहनावरून उतरवून उपमहापौरांनी त्याच्याकडून चक्क रस्ता धुवून घेतला. तसेच, पुन्हा रस्त्यावर न थुंकण्याची सक्त ताकीद देखील दिली. उपमहापौरांच्या या कृतीचे पुणेकरांनी कौतुक केले आहे.

उपमहापाैरांनी केली कान उघडणी

लुंबिनी थिम पार्क येथे एक तरुण दुचाकीवरुन जात असताना हेल्मेट घातलेले असताना देखील ते वर करुन रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकला. हे धेंडेंच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ त्या तरुणाला थांबवून त्यानी केलेल्या चुकीची जाणीव करून दिली. थुंकणाऱ्या तरुणाला पार्कजवळील एका दुकानातून पाणी आणायला सांगून थुंकलेली जागा स्वच्छ करून घेतली. तसेच परत रस्त्यावर न थुंकण्याची सक्त ताकीद देखील दिली. उपमहापाैरांनी कान उघडणी केल्यानंतर त्या तरुणाने रस्त्यावर न थुंकण्याचा शब्द देखील दिला.

- Advertisement -

स्वच्छतेसाठी महापालिका प्रयत्नशील

पुण्यातील आपल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये उपमहापौर सिद्धार्थ धेंडे स्वच्छतेची असणारी पाहणी करत असताना लुंबिनी थिम पार्क या प्रभागात ही घटना घडली. पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिका नेहमी तत्पर असते. तसेच अनेक उपक्रम देखील राबवत असते. त्यातच स्वच्छ सर्वेक्षण नुकतेच पार पडले. यात पुण्याला स्वच्छतेत पहिला नंबर कसा मिळेल यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -