घरमुंबई१३ श्री सदस्यांचा उष्माघाताने बळी राजकीय भेटीगाठी सुरू, जबाबदारी कुणावरही नाही

१३ श्री सदस्यांचा उष्माघाताने बळी राजकीय भेटीगाठी सुरू, जबाबदारी कुणावरही नाही

Subscribe

नवी मुंबईच्या खारघरला रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने बळी पडलेल्या श्री सदस्यांची संख्या १३ वर गेली आहे. या कार्यक्रमादरम्यान ६०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी सकाळपासूनच राजकीय नेत्यांच्या रुग्णालयात जखमींना भेटण्यासाठी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत आणि जखमींवरील उपचाराचा खर्च करण्याची तयारी दाखवली आहे, मात्र अद्याप राज्य सरकारने या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण हे स्पष्ट केले नसून श्री सद्स्यांमध्ये यंत्रणांच्या हलगर्जीपणाबाबत प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

या घटनेनंतर नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला सोमवारी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची विचारपूस केली. या दुर्घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केला, तर कार्यक्रमाची वेळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी निश्चित केली होती, अशी माहिती सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी चौकशी कुणी कुणाची करायची, असा सवाल केला आहे. तसेच अमित शहा यांच्यासाठी दुपारची वेळ ठरविल्याने दुर्घटना झाल्याचे सांगून ठाकरे यांनी अमित शहा यांना जबाबदार धरले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले. जर अमित शहांना जायचे होते म्हणून जर संध्याकाळचा कार्यक्रम दुपारी घेतला गेला असेल तर चौकशी कुणी करायची? मृतांचा आकडा ११ आहे, पण हा आकडा दुर्देवाने वाढूही शकतो.
-उद्धव ठाकरे,माजी मुख्यमंत्री

- Advertisement -

कालच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्री सदस्यांच्या जाण्याने माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबrयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेतात ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.-अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

यात कोणत्याही पद्धतीचे राजकारण होऊ नये
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरमध्ये आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्या कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो. त्यांच्या कुटंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.
-पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, महाराष्ट्र भूषण

कधी नव्हे ते मुंबईतसुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळले नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही याची काळजी घ्यावी.
-राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -