घरमहाराष्ट्रचर्चा अजित पवारांच्‍या बंडाची

चर्चा अजित पवारांच्‍या बंडाची

Subscribe

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईच्या दौर्‍यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पाठ वळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चा सर्वत्र राज्यभर पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचे निमित्त ठरलेय ते सोमवारी पुण्यातील एका कार्यक्रमातील दादांची अनुपस्थिती. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला अजित पवार उपस्थित राहणार होते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईच्या दौर्‍यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पाठ वळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चा सर्वत्र राज्यभर पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचे निमित्त ठरलेय ते सोमवारी पुण्यातील एका कार्यक्रमातील दादांची अनुपस्थिती. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्याला अजित पवार उपस्थित राहणार होते. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेतही तसा उल्लेख होता, परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे समजताच त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र यायचे नसल्याने अजितदादांनी हा कार्यक्रम टाळल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

यानंतर देवगिरी या शासकीय निवासस्थानी सोमवारी मुक्काम करत अजित पवारांनी दिवसभर आपले समर्थक आमदार, निवडक पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांशी फोनवरून चर्चा केल्या. त्यातच बंडाच्या आधीची जमवाजमव करण्यासाठी मंगळवारी दादांनी समर्थक आमदार, पदाधिकार्‍यांची बैठक बोलवल्याच्या वावड्या उठल्या. त्याचे खंडन करत कुठलीही बैठक बोलवली नसल्याचा खुलासा अजित पवारांनी केला.

- Advertisement -

रविवारी नागपूरच्या आघाडीच्या सभेत अजित पवारांनी भाषण न केल्याने त्यांच्याबद्दलचा संशय कायम आहे. नागपूरहून परतताना अजित पवारांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताचा फटका बसलेल्या रुग्णांची नवी मुंबईत उतरून भेट घेतली. तेथून पुण्याला रवाना होत सोमवारी सासवड येथील मेळावा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता. शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नव्हते, परंतु अचानक अजित पवार यांच्याऐवजी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे समजताच उपस्थितांमध्येही कुजबूज सुरू झाली. त्यानंतर अजित पवारांचे पुण्यातील इतर कार्यक्रमही अचानक रद्द करण्यात आले. त्यावर सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे, असे अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच नॉट रिचेबल झालेल्या काळात अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचे म्हटले जाते. ही भेट भाजपच्या वजनदार नेत्यांसोबतच शरद पवारांच्या जवळच्या तसेच दिल्लीतील वर्तुळात चांगली ऊठबस असलेल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने घडवून आणल्याची चर्चा आहे. यानंतरच भाजपबाबत सूर बदलल्याने अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले होते, तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्यावर कुटुंबावर दबाव येत असल्याने ज्याला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल, तो घेऊ शकतो, पण पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाही, असा खुलासा केल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला होता. म्हणजेच केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव असलेले कुठलेही नेते भाजपसोबत जाऊ शकतात कारण त्यांच्यावर खासकरून अजित पवारांवर आता शरद पवारांचे नियंत्रण राहिलेले नाही, हे स्पष्ट होते.

- Advertisement -

दादांसोबत कोण आमदार जाणार, कोण राहणार
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या ५३ आमदारांपैकी अजित पवार दोन तृतीयांश म्हणजेच ३६ आमदार सोबत घेऊन बाहेर पडण्यात यशस्वी होतील किंवा कसे याविषयी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. ३० हून अधिक आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचे वृत्त सर्वप्रथम आपलं महानगरने शुक्रवार १४ एप्रिल रोजी दिले होते. दादांना पाठींबा देणार्‍या आमदारांत धनंजय मुंडे (परळी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), अनिल पाटील (अमळनेर), दिलीप बनकर (निफाड), माणिकराव कोकाटे (सिन्नर),अण्णा बनसोडे (पिंपरी), संजय बनसोडे (उदगीर), सुनील भुसारा (विक्रमगड), यशवंत माने (मोहोळ), नितीन पवार (कळवण ), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), सुनील शेळके (मावळ), संदीप क्षीरसागर (बीड) यांचा समावेश असेल. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, राजेंद्र शिंगणे आदी शरद पवारांसोबतच राहतील,अशी खात्रीलायक माहीती आपलं महानगरला मिळाली आहे.

आज आमदारांची कोणतीही बैठक नाही: अजित पवार
अजित पवार यांचा सोमवारचा पुण्याचा नियोजित दौरा रद्द झाल्याने संध्याकाळपर्यंत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र अजित पवार यांच्या कार्यालयाने खुलासा करत मंगळवारी आमदार किंवा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली नसल्याचे स्पष्ट केले.

बावनकुळे-शेलारांनी दिल्लीत घेतली शहांची भेट
भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या पक्षप्रवेशावर अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात येत असताना सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार दिल्लीत होते. या दोघांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -