घरमुंबईराज्यभरात स्वाइन फ्लूचे १८९ बळी

राज्यभरात स्वाइन फ्लूचे १८९ बळी

Subscribe

नाशिकमध्ये सर्वाधिक ३५ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. 

राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याला सामोरं गेल्यावर आता राज्यातील लोकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पण, भारतातील प्रत्येक हवामानात आढळणाऱ्या स्वाईन फ्लूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षीच्या १ जानेवारी ते ३० जून दरम्यान राज्यभरात जवळपास १८९ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७१६ एवढी आहे.

मार्च महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नाशिक, पुणे मनपा आणि पिंपरी-चिंचवड मनपामध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी गेले आहेत. १ जानेवारी ते ३ जुलै २०१९ या कालावधीत राज्यात स्वाईन फ्ल्यूचे १ हजार ७२६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १ हजार ४५८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मार्च महिन्यानंतर स्वाईन फ्ल्यू रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ई-फार्मसी’ विरोधात औषध विक्रेते संपावर जाणार?

सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये 

या कालावधीत राज्यात स्वाईन फ्ल्यूमुळे १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३५ मृत्यू झाले असून पुणे मनपामध्ये १३, पिंपरी-चिंचवड मनपामध्ये ५ तर पुणे ग्रामीण भागात ७ मृत्यू झाले आहेत.

फ्ल्यू विरोधी लसीकरण

आरोग्य विभागाच्या वतीने स्वाईन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय विनाविलंब उपचार, विलगीकरण कक्ष, प्रतिबंधक लसीकरण, साथरोग प्रतिबंध व नियंत्रक समितीची स्थापना करणे अशा विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मान्सून कालावधीत स्वाईन फ्ल्यू रुग्णांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. राज्यात अतिजोखमीच्या व्यक्तींना फ्ल्यू विरोधी लसीकरण मोफत आणि ऐच्छिक स्वरुपात करण्यात येत आहे. ३० जून अखेर राज्यातील १८ हजार ४७ गरोदर मातांना, ४ हजार ९९० उच्च रक्तदाब आणि मधुमेही व्यक्तींना तसंच, ६ हजार ७९६ डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना असे एकूण २९ हजार ८३३ जणांना फ्ल्यू विरोधी लसीकरण करण्यात आलं आहे.

स्वाईन फ्ल्यू उपचारासाठी आवश्यक ऑसेलटॅमीवीर औषधाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून मान्सूनच्या काळासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षण कार्यशाळा, आरोग्य शिक्षण मोहीम या माध्यमातून आवश्यक जनजागृती करण्यात येत आहे.
डॉ. प्रदीप आवटे, राज्याचे सर्वेक्षण अधिकारी

राज्यातील स्वाईन फ्ल्यूची आकडेवारी

महिना     रुग्ण     मृत्यू

जानेवारी   ११७      २६

फेब्रुवारी   ४०१      ५२

मार्च       ५८०      ६६

एप्रिल      ३२८      ३७

मे          १८८        ७

जून        १०२         १

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -