घरमुंबईमाहुलवासीयांना मिळणार म्हाडाची ३०० घरे

माहुलवासीयांना मिळणार म्हाडाची ३०० घरे

Subscribe

कुर्ल्यातील प्रिमियर कंपनीच्या जागेवरील घरे देण्याची मागणी

सुरक्षित आणि योग्य घरासाठी रविवारपासून आंदोलनाला बसलेल्या माहुलवासीयांना घरे देण्याची म्हाडाने तयारी दर्शवली आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी माहुलमधील रहिवाशांना 300 घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे कुर्ला येथील प्रिमियर कंपनीच्या जागेत विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली पाच हजार घरेही देण्यात यावीत, अशी मागणी माहुलवासी व आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये व तानसा जलवाहिनीमध्ये विस्थापितांना चेंबूरमधील माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु येथील रासायनिक व तेलशुद्धीकरण कंपन्यांमुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे अन्यत्र हलवण्यासाठी रविवारपासून माहुलमधील विस्थापितांनी विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीजवळ आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाची दखल शिवसेना व आपने घेतली असून त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. माहुलवासीयांच्या घरांविषयी तोडगा काढण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी म्हाडा अधिकारी आणि शिवसेना नेते व म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी सामंत यांनी माहुलवासीयांना तातडीने पहिल्या टप्प्यात म्हाडाकडील 300 घरे देण्याची तयारी दर्शवली. यासाठी आंदोलनकर्त्यांची यादी त्यांनी म्हाडाकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. ही यादी दिल्यानंतर घरे देण्यासंदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती ‘घर बचाओ, घर बनाओ’ आंदोलनाचे सदस्य बिलाल खान यांनी दिली.

- Advertisement -

म्हाडाने पहिल्या टप्प्यात 300 घरे देण्याची तयारी दर्शवली असतानाच विमानतळलगतच्या झोपडीधारकांना स्थलांतरित करण्यासाठी कुर्ला येथील प्रिमियर कंपनीच्या जागेमध्ये बांधलेली घरे देण्यात यावी अशी मागणी माहुलवासीय व आपकडून करण्यात आली आहे. विमानतळलगतच्या झेापडीधारकांसाठी ही घरे आरक्षित असली तरी नुकतेच मुख्यमंत्र्यांनी या झोपडीधारकांचे जागेवरच पुनर्वसन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या जागेवरील आरक्षण काढून ही घरे माहुलवासीयांना द्यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रवक्ता धनंजय शिंदे यांनी केली आहे. आंदोलकांनी हा मुद्दा राज्य गृहनिर्माण मंत्री रवींद्र वायकर यांच्याकडेही उपस्थित केला असता त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बिलाल खान यांनी सांगितले.

प्रकाश महेतांना देणार गुलाब

सुरक्षित हक्काच्या घरासाठी रविवारपासून आंदोलन करत असलेल्या माहुलवासीयांची शिवसेनेच्या नेत्यांकडून दखल घेण्यात येत आहे. परंतु राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश महेता यांच्याकडून काहीच प्रतिसाद येत नाही. प्रकाश महेता यांनीही यात लक्ष घालून हे प्रकरण मार्गी लावावे यासाठी माहुलवासीय बुधवारी महेता यांच्या घरी जाऊन गांधीगिरी मार्गाने त्यांना गुलाब व पोस्टकार्ड देणार आहेत.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंच्या आदेशामुळे न्याय

माहुलवासीयांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी आदित्य यांनी त्यांचा मुद्दा मुख्यमंत्री व राज्यपालांकडे मांडला असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्य गृहनिर्माण मंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच मंगळवारी सामंत व वायकर यांनी बैठक बोलवून घरे देण्याची तयारी दर्शवली, अशी माहिती बिलाल खान यांनी दिली.

सायनमधील नागरिकांवर दबाव

सायन परिसरातून जात असलेल्या तानसा जलवाहिनीलगतच्या कोळीवाड्याजवळील पंचशील नगरमधील 47 झोपडीधारकांना पहिल्या टप्प्यात माहुल येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. झोपडीधारकांना चाव्याही देण्यात आल्या आहेत. परंतु येथील परिस्थितीमुळे झोपडीधारक घरे घेण्यास नकार देत आहेत. यावर पालिकेकडून तुम्हाला घरांची गरज नाही असे समजून तुम्हाला घर नाकारण्यात येईल, अशी धमकी देत त्यांना घरे घेण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे, अशी माहिती आपचे धनंजय शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -