घरफिचर्सएकतेचे महान पुरस्कर्ते सरदार पटेल

एकतेचे महान पुरस्कर्ते सरदार पटेल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताच्या इतिहासामध्ये सन 1947 च्या पहिल्या सहा महिन्यांचा काळ अतिशय नाजूक होता. वसाहतवादाची सत्ता आता संपुष्टात येणार हे निश्चित झाले होते. भारताचे विभाजन अटळ होते. परंतु या देशाची नेमकी कशी आणि किती विभागणी होणार याविषयी अनिश्चितता होती. एकापेक्षा जास्त विभागात देशाची वाटणी होण्याची शक्यताही जास्त होती. देशात वस्तूंच्या किंमती वाढत्या होत्या. अन्नधान्याची टंचाई तर सर्वसामान्य समस्या होती. तरीही भारताची अखंडता आणि एकता अक्षुण्ण रहावी,याविषयी लोकांचे एकमत होते. अशा सगळ्या एकूणच गोंधळाच्या परिस्थितीमध्ये, साधारण जून १९४७ मध्ये गृहखात्याचे कार्य सुरू झाले. देशभरामध्ये 550पेक्षा अधिक राजघराण्यांची संस्थाने होती. या संस्थानिकांशी संवाद साधून,त्यांच्याशी वाटाघाटी करून स्वतंत्र भारताचे नवे नातेसंबंध प्रस्थापित करण्याचे मोठे अवघड काम आता गृहखात्याकडे होते.

विशेष म्हणजे या संस्थानिकांच्या राज्यांमध्ये कोणतीही समानता नव्हती. आकारमान,लोकसंख्या,भौगोलिक प्रदेश,आर्थिक परिस्थिती अशा विविध प्रकारची असमानता या संस्थानिकांमध्ये होती. त्यामुळे या सर्वांची मोट एकत्रित बांधण्यासाठी तितक्याच कणखर व्यक्तीची आवश्यकता होती.यावेळी सरदार पटेलांबद्दल बोलताना ‘‘राज्यांच्या,संस्थानिकांच्या समस्या सोडवण्याचे काम अतिशय आव्हानात्मक आहे आणि हे अवघड कार्य तुमच्याशिवाय कोणी करू शकणार नाही. हे काम तुम्हीच करू शकणार आहात.’’असे उद्गार महात्मा गांधींनी त्यावेळी काढले.

- Advertisement -

सरदार पटेल यांची स्वतःची अशी एक कार्याची पद्धत होती. एखादे काम हाती घेतले की,त्याच्या प्रशासनाची उत्तम आणि प्रभावी कार्यव्यवस्था ते तयार करीत. या कामातही त्यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवली. हाती वेळ अतिशय कमी होता आणि कामे तर खूप होती. वल्लभभाई पटेल हे काही साधीसुधी आसामी नव्हते,ते‘सरदार पटेल’होते. त्यांनी कामाची रूपरेषा आखली आणि त्याप्रमाणे झपाट्याने अंमलबजावणी करायला लागले. त्यांच्या समुहातल्या मंडळींनी वेगवेगळ्या संस्थानांना भेटी देवून, त्यांच्या चर्चा, वाटाघाटी सुरू केल्या. संस्थानिकांच्या विलिनीकरणाच्या कामाला प्रारंभ केला आणि एकात्म भारताची निर्मिती करण्याचा मार्ग पटेल यांनीआश्वासित केला.

त्या काळामध्ये सरदार पटेल अगदी 24 तास,अखंड भारत निर्मितीसाठी कार्यरत राहिले, त्यामुळेच आपल्याला आजचा एकत्रित भारताचा नकाशा पहायला मिळतो आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर व्ही.पी. मेनन यांनी सरकारी सेवेतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सरदार पटेल यांनी त्यांना सांगितले की, ही वेळ काही आता सेवानिवृत्ती पत्करण्याची नाही किंवा विश्रांती घेण्याचीही नाही,तर काम आणि सतत काम करण्याची आहे. सरदार पटेल यांनी गृह खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी व्ही. पी. मेनन यांच्यावर टाकली. मेनन यांनी आपल्या ‘द स्टोरी ऑफ द इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस’ या पुस्तकामध्ये सरदार पटेल यांच्या कार्याचा उल्लेख केला आहे. कोणतेही काम परिश्रमपूर्वक, अथकपणे कशा पद्धतीने करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच मला आणि आमच्या गृह खात्याच्या टीमला सरदार पटेल यांनी घालून दिला, असं मेनन यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे. संस्थानिकांचे विलीनीकरण करताना देशवासियांच्या हिताचा विचार सर्वात प्रथम केला गेला पाहिजे. जनहितामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. असा स्पष्ट आणि ठाम विचार सरदार पटेल यांचा होता. त्यामुळे कोणावरही अन्याय न करता त्यांनी ही अतिशय अवघड जबाबदारी पार पाडली,असंही मेनन यांनी पुस्तकामध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

दि.15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वतंत्र भारताचे नवे पर्व सुरू झाले. परंतु तसं पाहिलं तर राष्ट्रनिर्माणाचे वेगळे कार्य अद्याप खूप दूर होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री या नात्याने पटेल यांनी अतिशय वेगाने कामाला प्रारंभ केला. कामाची विशिष्ट चौकट तयार केली. या स्वतंत्र देशातल्या गरीब आणि दुर्लक्षित समाजावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. त्यांचे हक्क अबाधित राहतील याची पटेल यांनी काळजी घेतली.

सरदार पटेल यांच्यामध्ये महान प्रशासकाचे गुण होते. प्रभावीपणे प्रशासन कसे चालवले जाते,याचा त्यांना दांडगा अनुभव होता.1920च्या दशकामध्ये अहमदाबाद महापालिकेमध्ये ते निवडून आले होते. त्यावेळी कामाचा त्यांना चांगला अनुभव होता. त्यामुळेच पटेल यांनी स्वतंत्र भारतामध्ये प्रशासकीय चौकट आखण्याची कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. अहमदाबादमध्ये सत्तेत असताना त्यांनी संपूर्ण शहरामध्ये सफाईची,स्वच्छतेची मोहीम अतिशय प्रभावीपणाने चालवली होती. पूर्ण शहरामध्ये सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करणारी योजना त्यांनी कार्यान्वित केली होती. इतकेच नाही, तर शहरामध्ये रस्ते, विद्युत पुरवठा आणि शिक्षण व्यवस्था कशी असावी, याकडे लक्ष देवून त्यासाठी काळजीपूर्वक नियोजनही पटेल यांनी केलं होतं.

आज आपल्या भारतामध्ये सहकार क्षेत्राविषयी खूप चर्चा होते. या सहकार क्षेत्राचे बीज रोवण्याचे कार्य सरदार पटेल यांनीच केले आहे. आज देशात सहकार क्षेत्र चांगले कार्य करीत आहे,त्याचे संपूर्ण श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांनाच द्यावे लागणार आहे. आज‘अमूल’चे खूप कौतुक होते. त्याची पाळेमुळे पाहिली तर सरदार पटेल यांचे नाव घेतले जाईल. कारण स्थानिक समाजाला विशेषतः महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी त्यांनी सहकारी संस्थाची निर्मिती केली. सहकारी गृह संस्था,दूध संस्था सरदार पटेल यांच्या विचारमंथनातून आणि कार्यातून निर्माण झाल्या आहेत. हे आपण विसरून चालणार नाही. आज या सहकारी संस्थांमुळे असंख्य लोकांना प्रतिष्ठेने,मानेने जगता येत आहे. असंख्य लोकांना हक्काचे घर अशा सहकारी संस्थांच्या कामांमुळे मिळाले आहे.

विश्वास आणि एकात्मता,अखंडता,सचोटी शब्दांना जर कोणता प्रतिशब्द आहे तर तो म्हणजे – सरदार पटेल!! भारतातल्या शेतकरी बांधवांचा त्यांच्यावर प्रगाढ विश्वास होता.काही झाले तरी ते किसान पुत्र होते,बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व सरदार पटेल यांनी केले. श्रमजिवी लोकांना त्यांची प्रभावी भाषणे ऐकून नवा आशेचा किरण दिसला. इतकंच नाही तर अगदी व्यापारी आणि उद्योगपतीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला सिद्ध झाले. याचे कारण म्हणजे भारताला आर्थिक आघाडीवर आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये समृद्धीच्या मार्गावर नेण्याची क्षमता सरदार पटेल यांच्यासारख्या धडाडीच्या नेत्यामध्ये आहे,याची खात्री त्यावेळी सर्वांना पटली होती.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणजे सरदार पटेल यांचा हा ‘ऐक्याचा पुतळा’ दोन अर्थांचे प्रतीक आहे. एक तर सर्वांच्या मनाचे ऐक्य, एकतेचे प्रतीक आहे,त्याचबरोबर आपल्या मातृभूमीच्या भौगोलिक एकतेचेही प्रतीक आहे. विभाजन करणे हा काही आपला गुण नाही. विभाजित होवून आपण कोणत्याही समस्येला तोंड देवू शकणार नाही. याउलट एकत्र राहिलो तर कोणत्याही संकटाला सामोरं जावू शकणार आहोत. इतकेच नाही तर एकतेच्या जोरावर आपला देश वैभवशाली बनून समृद्धीचे नवे शिखर गाठू शकणार आहे.

– नरेंद्र मोदी,पंतप्रधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -