घरमुंबईबेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचा एल्गार

बेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचा एल्गार

Subscribe

बेस्ट कर्मचार्‍यांच्या सलग तिसर्‍या दिवशीच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने ‘मेस्मा’ अंतर्गत संपकरी कर्मचार्‍यांपैकी जे कर्मचारी बेस्ट वसाहतीत राहतात, त्यांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा दिल्या. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनीच वडाळा आगारावर मोर्चा काढला. या मोर्चाची दखल सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारने घेतली. परंतु, तिसर्‍या दिवशी रात्रीपर्यंत यावर तोडगा काढण्यासाठी नुसत्याच बैठका पार पडल्या. मात्र, निर्णय झाला नसल्याने हा संप आता चौथ्या दिवशीही सुरू राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आता या संपाला म्युनिसिपल मजदूर युनियनच्या संघटनेनेही पाठिंबा दिला.

या मोर्चामुळे बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांना नगरविकास सचिव यांनी चर्चेसाठी बोलावले, तसेच बेस्ट कृती समिती आणि बेस्ट प्रशासनामध्येही बैठक झाली. मात्र, ‘आमची केवळ आश्वासनाने बोळवण करू नका, ठोस अंतिम निर्णय घ्या, लिखित आश्वासनाशिवाय संप मागे घेणारच नाही, अशी भूमिका संपकरी कर्मचार्‍यांच्या नेत्यांनी घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्यावर याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली. मात्र, अद्यापि या बैठकीत तोडगा निघाला नाही. बेस्ट कामगारांनी संप पुकारला असून तिसर्‍या दिवशीही बेस्टच्या गाड्या रस्त्यावर आल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून बेस्ट कृती समिती व बेस्ट व्यवस्थापक यांच्यात ’मॅरेथॉन’ चर्चा झाली. या चर्चेतही तोडगा निघाला नाही. दुसरीकडे बेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना माझ्याकडे आलात, आता तुमचा प्रश्न सुटणार, असे आश्वासन दिले.

- Advertisement -

सहकुटुंब रस्त्यावर उतरणार
गुरुवारी वडाळा डेपोवर शेकडोंच्या संख्येत महिलांनी बेस्ट प्रशासनाविरोधात मोर्चा काढला होता. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शुक्रवारपासून सहकुटुंब रस्त्यावर उतरू, असा इशारा संपकरी कर्मचार्‍यांच्या नातलग महिलांनी बेस्ट प्रशासनाला दिला.

या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. आम्ही संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. आम्ही खंबीरपणे बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागे उभे राहू. बेस्ट कामगारांवर पोलिसांनी केस टाकू नये, केस टाकायची असेल तर माझ्यावर टाका. योग्य व अधिकृत संदेश घेऊन येणार्‍यांचे ऐका. तुम्हाला पटले, तरच आंदोलन मागे घ्या.
– आमदार नितेश राणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -