घरCORONA UPDATELockDown: ९० दिवसाचे काम अवघ्या १५ दिवसात; कोपर पुलाचे तोडकाम अखेर पूर्ण

LockDown: ९० दिवसाचे काम अवघ्या १५ दिवसात; कोपर पुलाचे तोडकाम अखेर पूर्ण

Subscribe

डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल हा कमकुवत झाल्याने १५ सप्टेंबरपासून वाहतूकीस बंद ठेवण्यात आला होता. केडीएमसीकडून नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कोपर पुलाचे तोडकाम अवघ्या १५ दिवसांत पूर्ण झाले आहे. साधारण पुलाचे पाडकाम करण्यासाठी ९० दिवसाचा कालावधी लागला असता. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने रेल्वे प्रवासी वाहतूक बंद आहे. लॉकडाऊनमुळेच ९० दिवसाचे काम अवघ्या १५ दिवसात पालिकेला पूर्ण करता आले आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल हा कमकुवत झाल्याने १५ सप्टेंबरपासून वाहतूकीस बंद ठेवण्यात आला होता. केडीएमसीकडून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. पूल बांधणीसाठी पालिकेकडून चार वेळा निविदा काढण्यात आल्या मात्र त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे रेल्वे सेवेतील माल वाहतूक वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्यामुळे उड्डाणपूल दुरुस्तीचे काम जलद गतीने पूर्ण करणे शक्य असल्याने रेल्वे प्रशासनाने १० एप्रिल २०२० रोजी पालिकेला पत्र पाठवून पुलाचे काम तातडीने हाती घेण्याबाबत सुचना केली होती. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उड्डाणपूल पुर्नःबांधणीचे काम १७ एप्रिल २०२० पासून सुरुवात केली होती. रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅककरिता वाहतूक आणि विद्युत पुरवठा खंडीत करुन टप्याटप्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पूलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे सेवा सुरू असती तर हेच काम करण्यासाठी किमान ३ महिने कालावधी लागला असता. परंतु संचारबंदीचे कालावधीत काम सुरु करण्‍याबाबत निर्णय झाल्याने अवघ्या १५ दिवसात हे तोडकाम पूर्ण करणे शक्य झाले आहे.

- Advertisement -

पूलाच्या सबस्‍क्‍ट्रचरच्या दुरुस्‍तीचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येणार असून त्यानंतर डेस्क स्लॅब पुर्नःबांधणीचे काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. सध्या पुलाचे काम पालिकेच्या शहर अभियंता, सपना कोळी-देवनपल्‍ली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) तरुण जुनेजा यांचेमार्फत सुरु असून कामाचे ठेकेदार पुष्पक रेल कन्ट्रक्शन प्रा.लि. हे आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या कामाची पाहणी करून पुलाचे राजाजी पथवरील अंडरपाससह पुर्नःबांधणीचे काम पुढील सहा महिन्याच्या कालावधीत पुर्ण करणेबाबतचे निर्देश दिले आहेत. हे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडील अतिरिक्त रेल्वे प्रबंधक आशुतोष गुप्ता, वरिष्ठ विभागीय अभियंता (ऊ. पु.) मळभागे यांचे विशेष सहकार्य लाभले. ३० एप्रिल २०२० रोजी रेल्वे ट्रॅकवरील तोडकाम पूर्ण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -