घरताज्या घडामोडीवरळी सी लिंकवरील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईची मागणी

वरळी सी लिंकवरील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाईची मागणी

Subscribe

वांद्रे-वरळी सी लिंकवर लावण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांवर पालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत आणि समिता कांबळे यांनी आज विधी समितीच्या बैठकीत केली. तसेच, हे जाहिरात फलक कोणाच्या आशीर्वादाने उभे आहेत, त्याचे नेमके कुणाशी लागेबंधे आहेत? अनधिकृत जाहिरात फलक उभा करणाऱ्यांवर महापालिका अधिकारी कारवाई करण्यात कुचराई का करत आहेत, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत नगरसेवक सामंत, ज्योती आळवणी कांबळे यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला.

जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर आणि विविध इमारतींवर जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी काही फलक उभारण्यात आले आहेत. काही फलक हे शहरातील रस्त्यांलगत, सोसायटीत लावण्यात आले आहेत. सदर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची टिकून राहण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. असे काही फलक आज धोकादायक स्थितीत आहेत. या फलकांमुळे काही दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. तसेच, मोठी वित्तीय हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे भाजप नगरसेवकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जाहिरात फलकांची तपासणी करणे गरजेचे

वास्तविक, या जाहिरात फलकाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांनी नियमितपणे फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर करणे गरजेचे असते. फलकावर जाहिरात प्रदर्शित करण्यापूर्वी फलक कोसळून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास भरपाई मिळण्याच्या दृष्टीने जाहिरातदार कंपनीकडून विमा प्रमाणपत्र घेण्यात येते, असे महापालिकेने म्हटले आहे . मात्र एखाद्याच्या जीविताची किंमत अशाप्रकारे केवळ विम्याची रक्कम देऊन करता येणार नाही. त्यासाठी वेळोवेळी आयुष्य संपलेल्या जाहिरात फलकांची तपासणी करणे गरजेचे आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकवर डाव्या बाजूला अनेक जाहिरात फलक अनधिकृत आहेत. तेथे १२ जाहिरात फलक असून महापालिकेने केवळ दोनच फलक असल्याचे सांगितले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या वतीने त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. वांद्रे-वरळी सी लिंकवर उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत कोणताही तपशील महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करून मोडकळीस आलेल्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतल्या नाईट क्लबमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन; पालिकेची कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -