घरमुंबईझाड पडून आईचा बळी गेल्यावर मुलाने बनविला अ‍ॅप

झाड पडून आईचा बळी गेल्यावर मुलाने बनविला अ‍ॅप

Subscribe

नालेसफाई, रस्त्यातील खड्डे, झाडांच्या धोकादायक फांद्या, तुटलेली गटारांची झाकणे यासारख्या समस्या मांडण्याबरोबरच त्यांचा पाठपुरावा करणे नागरिकांना शक्य व्हावे यासाठी त्याने सर्वसमावेशक मोबाईल अ‍ॅप बनवला आहे.

नालेसफाई, रस्त्यातील खड्डे, झाडांच्या धोकादायक फांद्या, तुटलेली गटारांची झाकणे यासारख्या समस्या मांडण्याबरोबरच त्यांचा पाठपुरावा करणे नागरिकांना शक्य व्हावे यासाठी पालिकेने सर्वसमावेशक मोबाईल अ‍ॅप तयार करावा. अन्यथा मी बनवलेल्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करावा, असे जाहीर आवाहन राजश्री नाथ याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना केले आहे. गेल्या वर्षी नारळाचे झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या कांचन नाथ यांचा राजश्री हा मुलगा आहे. प्रशासनाचा अ‍ॅप व माझ्या अ‍ॅपमधून सर्वोत्तम अ‍ॅप निवडण्याचा अधिकार नागरिकांना द्यावा, असेही त्याने सांगितले.

मुंबईतील प्रत्येक नागरिक कर भरतो. त्या तुलनेत सुविधा मिळतात का?, नागरिक सुरक्षित आहेत का?, परिसरातील समस्यांच्या तक्रारी कोठे करायच्या, त्याचा पाठपुरावा कसा करावा याबाबतही अनेकांना माहिती नसते. एखाद्याने प्रयत्न केल्यास पालिका अधिकारी व कर्मचारी त्याला भंडावून सोडतात. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या सहज मांडता याव्यात व तिचा पाठपुरावा करणे शक्य व्हावे, यासाठी मी अ‍ॅप तयार केला आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचे छायाचित्र व व्हिडीयो टाकल्यानंतर त्याचे निरसन झाले का? कधी झाले? कोणत्या कंत्राटदाराने केले? कोणत्या अधिकार्‍याच्या नियंत्रणाखाली झाले, अशी सर्व माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

समस्या मांडताना व निरसन झाल्याचे छायचित्र किंवा व्हिडिओ अ‍ॅपवर टाकताना जीपीएस गरजेचे असल्याने खोट्या समस्या नागरिकांना टाकता येणार नाहीत तसेच पालिकेच्या कर्मचार्‍यांनाही अन्य ठिकाणचे छायाचित्र टाकता येणार नाही. त्यामुळे कामामध्ये पारदर्शकपणा येईल व पालिकेवर नागरिकांचा वचक राहण्यास मदत होईल, असे राजश्री यांनी सांगितले. माझ्या आईच्या मृत्यूनंतर पालिका दरबारी आलेल्या अनुभवातूनच नागरिकांना त्यांच्या समस्या मांडणे शक्य व्हावे या हेतूने हा अ‍ॅप बनवला असल्याचेही त्याने सांगितले. या अ‍ॅपवर नागरिकांनी महिन्यातील फक्त ११ मिनिटे दिल्यास शहरातील सर्व समस्या दूर होतील, असा दावाही त्याने केला. मुंबई मेट्रोपॉलिटिन शहर असल्याने हा अ‍ॅप १४ भाषांमध्ये बनवण्यात येणार आहे.

 

- Advertisement -

अशिक्षितही वापरू शकतात अ‍ॅप

प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असला तरी अ‍ॅप वापरण्याचे ज्ञान प्रत्येकाला नसते. त्यामुळे हा अ‍ॅप अशिक्षितांही वापरता यावा, यासाठी ‘व्हॉईस कमांड’ची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे अ‍ॅपला तोंडी आदेश दिल्यानंतर त्यानुसार तो वापरकर्त्याला समस्या मांडण्यासाठी मदत करेल.

नियमानुसार बनवला अ‍ॅप

‘डिजिटल इंडिया’च्या नियमानुसार हा अ‍ॅप बनवला आहे. यामध्ये पालिकेच्या कोणत्या विभागाने कसे व कोणती कामे करावीत याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे कोणत्या विभागाकडे तक्रार करायची याची माहिती नागरिकांना सहज मिळणार आहे.

जुन्या तक्रारीही सहज मिळणार

महापालिकेच्या कार्यालयात अनेकदा जुन्या तक्रारींचा तपशील मिळत नाही. त्यामुळे तक्रारींचे पुढे काय झाले हे कळत नाही. तसेच ऑनलाईन तक्रारही ठराविक कालावधीनंतर डिलीट होते. पण या अ‍ॅपवर प्रत्येक तक्रारीचा तपशील अनेक वर्ष मिळण्याची सुविधा आहे.

सिटीझन अरेस्ट’ची सुविधा

रस्त्यात थुंकणे, कचरा करणे अशा चुका नागरिकांनी केल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई होते. परंतु जर असाच एखादा गुन्हा करताना सरकारी कर्मचारी दिसल्यास त्याचे छायाचित्र किंवा व्हिडीओ सबळ पुराव्यासह अ‍ॅपवर टाकून नागरिकांना सरकारच्या निदर्शनास आणता येईल. अशा अधिकार्‍यावर कारवाई करणे त्यामुळे शक्य होणार आहे.

अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार

पालिकेचे कर्मचारी व अधिकारी कामे करत नाहीत, असे नेहमी म्हटले जाते. पण या अ‍ॅपमुळे काम करण्याची इच्छा असलेल्या अधिकार्‍यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच चांगले काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे कर्तृत्व अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांसमोर येईल. फेसबुक व ट्विटरप्रमाणे अ‍ॅपच्या माध्यमातून पालिकेच्या कामावर नागरिकांना मत मांडता येणार आहे.

 

आईच्या मृत्यूप्रकरणी मला पालिकेकडून भरपाई मिळणे अद्याप बाकी आहे. पालिकेने भरपाई देण्याऐवजी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व पारदर्शी कारभारासाठी हा मोबाईल अ‍ॅप वापरल्यास मला नुकसान भरपाई मिळाली असे मी समजेन.

– राजश्री नाथ

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -