घरमुंबईलोकलने अंबरनाथ रिटर्न मारणाऱ्या प्रवाशांना मनसेचा झटका!

लोकलने अंबरनाथ रिटर्न मारणाऱ्या प्रवाशांना मनसेचा झटका!

Subscribe

अंबरनाथमध्ये उल्हासनगर, विठ्ठलवाडीवरून रिटर्न मारणाऱ्या प्रवाशांमुळे स्थानिक प्रवाशांना लोकलमध्ये चढायला किंवा बसायला जागाच मिळत नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी याचा निषेध करण्यासाठी अंबरनाथच्या मनसे शाखेकडून स्थानकावर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी रिटर्न मारणाऱ्या प्रवाशांना लोकलमधून उतरवून स्थानिक प्रवाशांना जागा करून दिलं.

मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज स्थानक अर्थात सीएसटीएमच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये बसायला जागाच मिळत नाही ही अंबरनाथमध्ये राहाणाऱ्या सर्वच प्रवाशांची तक्रार असते. गर्दीच्या वेळी म्हणजेच सकाळच्या सुमारास तर ही तक्रार भांडणांमध्ये रुपांतरीत होते. अनेकदा भांडणं हमरी-तुमरीवर येतात आणि प्रसंगी हाणामारीच्याही घटना घडतात. अंबरनाथ स्थानकावरून लोकलने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याच भाषेत उल्हासनगर, विठ्ठलवाडीवरून अंबरनाथ रिटर्न मारणाऱ्या प्रवाशांमुळेच हा सगळा गोंधळ होतो. अशाच प्रवाशांना बुधवारी सकाळी मनसेच्या अंबरनाथमधील कार्यकर्त्यांनी चांगलाच इंगा दाखवला.

- Advertisement -

रिटर्न प्रवाशांमुळे नेहमीचीच बोंबाबोंब

अंबरनाथवरून दररोज हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने येतात. यासाठी लोकल हा एकमेव स्वस्त आणि कमी वेळखाऊ पर्याय त्यांच्याकडे असतो. सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी इतर स्थानकांप्रमाणेच अंबरनाथ स्थानकावरही असते. मात्र, या गर्दीला ऐन सकाळच्या वेळी लोकलमध्ये चढायलाच मिळत नाही. आणि त्याला कारण असते विठ्ठलवाडी, उल्हासनगरहून डाऊन मारणारी गर्दी!

स्थानिक प्रवाशांवर अरेरावी

विठ्ठलवाडी किंवा उल्हासनगरमध्ये लोकलमध्ये चढायला मिळत नाही म्हणून ही गर्दी उलट दिशेने अंबरनाथला जाते. अंबरनाथहूनच लोकल सुटत असल्यामुळे रिकाम्या लोकलमध्ये आधीच ही गर्दी जागा सांभाळून चढलेली असते. त्यामुळे जेव्हा ही लोकल अंबरनाथ स्थानकात येते, तेव्हा आधीच खचाखच भरलेली असते. परिणामी अंबरनाथ स्थानकात लोकलमध्ये चढण्यासाठी जमा झालेल्या लोकांना चढताच येत नाही. ते चढलेच, तरी त्यांना बसायला जागा मिळत नाही. अनेकदा रिटर्न मारणाऱ्या प्रवाशांचे ग्रुप या प्रवाशांवर अरेरावी करतात. याचाच निषेध करण्यासाठी मनसेच्या अंबरनाथ विभागातर्फे बुधवारी सकाळीच अंबरनाथ स्थानकामध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं.

- Advertisement -

रिटर्न मारणाऱ्यांना खाली उतरवलं

बुधवारी सकाळी ९च्या सुमारास मनसेचे अंबरनाथ शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्थानकात आंदोलन केलं. यावेळी त्यांनी रिटर्न मारून अंबरनाथ स्थानकात आलेल्या लोकलमधल्या प्रवाशांना खाली उतरवून अंबरनाथमधील स्थानिक प्रवाशांना जागा करून दिली. यावेळी स्थानकात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर पोलिसांनी कुणाल भोईर यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आमच्याकडे यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. आमच्यावर आज जरी पोलिसांनी कारवाई केली असली, तरी आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार.

कुणाल भोईर, अंबरनाथ शहर अध्यक्ष, मनसे

दरम्यान, अशीच परिस्थिती मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरच्या अनेक स्थानकांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया सामान्य मुंबईकर प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -