घरमुंबईअवनी गेली, पैसेही गेले, हाती आला धतुरा!

अवनी गेली, पैसेही गेले, हाती आला धतुरा!

Subscribe

अवनी बचाव संस्थेची वकील महिलेकडून फसवणूक

अवनी या वाघिणीला ठार न मारता तिला जेरबंद करण्यात यावे यासाठी अनेक प्राणीमित्र संघटनांनी प्रयत्न केले होते, त्यापैकी मुंबईतील एका प्राणीमित्र संस्थेची एका कथित वकील महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी या संस्थेने या वकील महिलेविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे अनेक गावकर्‍यांवर हल्ला केल्याच्या संशयावरून महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून अवनी या वाघिणीला ठार मारण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली होती. अवनीला ठार मारण्यासाठी हैदराबाद येथून शिकारी नवाब शफत अली खान याला बोलावण्यात आले होते. दरम्यान, अवनीला ठार न करता तिला जिवंत जेरबंद करावे यासाठी अनेक प्राणीमित्र संस्था पुढे आल्या होत्या. त्यापैकी मुंबईतील ‘अर्थ ब्रिगेड फाऊंडेशन’ ही संस्थादेखील अवनीच्या बचावासाठी पुढे आली होती.

- Advertisement -

या संस्थेचे संचालक डॉक्टर पुदुग्राम सुब्रह्मण्यम यांनी संस्थेमार्फत अवनीच्या संरक्षणाकरिता महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना तसेच, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे (एनटीसीए) वरिष्ठ अधिकार्‍यांना ई-मेल पाठवण्यात आला होता.

या मेलमध्ये त्यांनी गावकर्‍यांचा मृत्यू अवनीच्या हल्ल्यातच झाला आहे का, याबाबत चौकशी करून तिला ठार मारण्याऐवजी जेरबंद करावे, असे नमूद केले होते. तसेच अवनीला ठार मारण्यासाठी हैदराबाद येथून बोलाविण्यात आलेले नवाब शफत अली खान यांना परत पाठविण्यात यावे अशी विनंती अर्ज करण्यात आला होता.

- Advertisement -

मात्र संबंधित विभागाकडून या संस्थेला कुठलेही उत्तर आले नसल्यामुळे या संस्थेने न्यायालयात जाण्याचे ठरवले. अर्थ फाऊंडेशन या संस्थेने जानेवारी २०१८ मध्ये संस्थेने नागपूरच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली. या संस्थेची अवनीला वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असताना त्यांची ओळख एका कथित वकील महिलेसोबत झाली.

ही महिला वकिलाने स्वतः वन्यजीव प्रेमी असल्याचे सांगत आपण अवनीला वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे सांगितले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फी जास्त असल्याचे तिने अर्थ फाऊंडेशनच्या संचालकांना पटवून दिले आणि तुमची संस्था आणि मी असे मिळून खर्च करू, असे सांगून संस्थेचे संचालक डॉक्टर पुदुग्राम सुब्रह्मण्यम यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र पैसे घेऊन तिने कुठलीही याचिका न्यायालयात दाखल केली नाही.

२ नोव्हेंबर २०१८ रोजी अवनीला जेरबंद न करता तिला ठार मारण्यात आले असल्याचे अर्थ फाऊंडेशनच्या संचालकांना कळल्यावर त्यांनी या वकील महिलेकडे दिलेले पैसे परत करावे म्हणून मागणी केली असता या महिलेने पैसे परत न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच ‘अर्थ ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्थेचे संचालक डॉक्टर पुदुग्राम सुब्रह्मण्यम यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात २ जानेवारी २०१९ रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी या कथित वकील महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

२ जानेवारी रोजी ‘अर्थ ब्रिगेड फाऊंडेशन’ संस्थेचे संचालक डॉक्टर पुदुग्राम सुब्रह्मण्यम यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली, तक्रारीची शहानिशा करून कथित वकील महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
– प्रकाश साळवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -