घरमुंबईठग्ज ऑफ रेल्वे!

ठग्ज ऑफ रेल्वे!

Subscribe

मुंबई ते दिल्लीदरम्यान रेल्वेतून आयात-निर्यात होणार्‍या लाखो रुपयांच्या साहित्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीहून मुंबईत येणार्‍या एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या स्वतंत्र बोगीमधून व्यापार्‍यांच्या साहित्याची चोरी होत आहे. रेल्वे सुरक्षा बलाची गस्त असूनसुद्धा महागडे साहित्य परस्पर लुटले जात आहे. त्यात कपडे, ज्वेलरी आणि इतर प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे.

या चोर्‍या मुंबईत होत नाहीत. दिल्लीहून ट्रेन निघाल्यानंतर मध्येच साहित्य लुटले जाते, असा दावा रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईतील अनेक व्यापारी दिल्लीहून साहित्य आयात करतात. हे साहित्य मुंबईत आणण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनचा आधार घेतला जातो. यामध्ये प्रामुख्याने गोल्डन टेम्पल, पश्चिम एक्स्प्रेस रेल्वे या दोन रेल्वेगाड्यांचा समावेश असतो. हे साहित्य सुखरुप आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांची प्रत्येक स्थानकावर गस्त असते.

- Advertisement -

रेल्वेच्या अखत्यारित असणार्‍या डब्यांतील साहित्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचार्‍यांकडे असते. मात्र रेल्वेकडून व्यापार्‍यांच्या खाजगी वापरासाठी काही डबे भाडेतत्वावर देण्यात आलेले आहेत. ज्या डब्यात भरण्यात येणार्‍या साहित्याची संपूर्ण जबाबदारी व्यापार्‍यांची असते. आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक चोर्‍या या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या डब्यांमध्ये झालेल्या आहेत. त्यात व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वेतून साहित्याची आयात-निर्यात करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. रेल्वेच्या अखत्यारित असणार्‍या डब्यातील साहित्यासाठी रेल्वे सुरक्षा बल जबाबदार असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून रेल्वेच्या व्यापार्‍यांना देण्यात आलेल्या डब्यांतील पार्सलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

अशी होते चोरी
व्यापार्‍यांना भाडेतत्वावर देण्यात येणारे डबे महिला डब्यांना लागून असतात. आतापर्यंत झालेल्या बर्‍याचशा चोरीच्या घटनांमध्ये या महिला डब्यांचा चोरीसाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. महिला डब्याला लागून असणार्‍या शौचालयाला भगदाड पाडून आतील साहित्य चोरले जाते, असे समोर आले आहे. हे साहित्य चोरी करणारे पुरुष आहेत की स्त्रिया याविषयी पोलिसांमध्ये संभ्रम आहे. या साहित्याची चोरी झाली आहे ही गोष्ट एक्स्प्रेस रेल्वे मुंबईत आल्यावर उघडकीस येते. मात्र या चोरीची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि लोहमार्ग रेल्वे पोलीस (जीआरपी) दोघेही घेत नाहीत. त्यामुळे रेल्वेतून साहित्याची आयात-निर्यात करणे व्यापार्‍यांना अवघड झाले आहे.

- Advertisement -

२३ डिसेंबर रोजी दिल्लीहून मुंबईत आलेल्या एक्स्प्रेसमधून जवळपास १९ लाखांचे साहित्य चोरीला गेले असल्याची माहिती उघड झाली. मुंबई सेंट्रल स्थानकात लोडर म्हणून काम करणार्‍या रफिक अहमद शेख आणि आरपीएफच्या जवानांनी ट्रेनच्या बोगीची पाहणी केली तेेव्हा ही बाब समोर आली. त्यानंतर आरपीएफने चोरी झालेल्या साहित्याचा अहवाल तयार करुन जीआरपी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास रफिक शेख यांना सुचवले. मात्र मुंबई सेंट्रल जीआरपी पोलिसांनी रफिक अहमद शेख यांची तक्रार घेण्यास नकार दिला. दिल्लीहून येणारे साहित्य आरपीएफ जवानांच्या सुरक्षिततेखाली येते त्यामुळे चोरी झालेल्या साहित्याची जबाबदारी त्यांची असून आम्ही अशा घटनांचा तपास का करावा, असा प्रश्न एका पोलीस अधिकार्‍याने शेख यांना विचारला.

या चोरीच्या घटनांमुळे अनेक व्यापार्‍यांना रेल्वेतून पार्सल पाठवावे की, नाही असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य उपाय न केल्यास रेल्वेला मोठा तोटा होऊ शकतो.

मी अनेकदा असे प्रकार पाहिले आहेत. वारंवार तक्रार देण्यासाठी आरपीएफ किंवा जीआरपीच्या दारात जावे लागते. मात्र आमच्या तक्रारींना ते जुमानत नाहीत. आरपीएफ आणि जीआरपीमध्ये होणार्‍या आरोप प्रत्यारोपांमुळे चोरींच्या प्रकरणांचा तपास तसाच रखडलेला आहे. त्यामुळे सुरक्षित आयात-निर्यातीचे माध्यम म्हणून पाहिल्या जाणार्‍या रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
– मनोज नारंग, तक्रारदार

या चोर्‍या मुंबईत होत नसून मुंबईच्या बाहेर होतात. त्यामुळे यांचा तपास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आतापर्यंत अशा एकूण तीन तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत, मात्र कोणतेच धागेदोरे हाती लागले नाहीत. हे साहित्य आरपीएफच्या नजरेखालून इथवर येते. त्यामुळे चोरी झाल्यास तेच जबाबदार आहेत. त्यांनीच अशा प्रकरणांचा तपास करावा.
-शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई सेंट्रल लोहमार्ग.

चोरी होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही बर्‍याचदा चोर्‍या झालेल्या आहेत. २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या एका आठवड्याच्या कालावधीत जवळपास पाच चोर्‍या झाल्या. आरपीएफने आपली जबाबदारी पूर्णपणे नाकारली, शिवाय जीआरपीकडे तक्रार नोंदवायला गेलो तर त्यांनीही तक्रार घेण्यास नकार दिला. दोघांनीही जबाबदारी टाळल्यामुळे आम्हा व्यापारी वर्गाचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे सुरक्षित आयात निर्यातीसाठी पाहिला जाणारा रेल्वेचा प्रवास आता नुकसानीचा वाटू लागला आहे.– रफिक अहमद शेख, तक्रारदार

रेल्वेने काही डबे व्यापार्‍यांना भाड्याने दिलेले आहेत. त्या डब्यातल्या सर्व साहित्याची जबाबदारी त्यांची स्वत:ची असते. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी स्थानकात त्यावर नजर टाकतात, मात्र त्या डब्यांना व्यापार्‍यांनी खाजगी टाळी लावलेली असल्यामुळे त्यातून काही चोरी झाल्यास आम्ही जबाबदार नसतो. त्या डब्यांतील सामानाची चोरी झाल्यानंतर त्याचा सविस्तर रिपोर्ट आम्ही त्यांना देतो, त्यावरुन ते जीआरपीकडे गुन्हा दाखल करु शकतात. त्यानंतर जीआरपीने त्याचा तपास करायचा असतो.
-उदय शुक्ला, आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -