वसई-विरार महापालिका आयुक्तपदी अनिल पवार आज कार्यभार स्वीकारणार

वसई-विरार महापालिका

वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाधरन डी. यांची उचलबांगडी झाल्यानंतर रिक्त झालेल्या पालिका आयुक्तपदी सहसचिव श्रेणीतील सिडकोतील ज्येष्ठ अधिकारी अनिल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त आयुक्त पवार हे गुरुवारी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनिल पवार हे 1997 च्या बॅचचे उपजिल्हाधिकारी असून ते सध्या सिडकोमध्ये अपर जिल्हाधिकारी पदी(निवड श्रेणी) प्रतिनियुक्तीवर सेवेत आहेत. अनिल पवार यांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये यापूर्वी यशस्वीपणे त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. ते यापूर्वी बीड येथे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे येथे अप्पर जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेमध्ये उपायुक्त, पुणे येथे निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव जिल्ह्यात प्रांताधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी आपल्या कामाचा आणि स्वतंत्र शैलीचा ठसा उमटवला आहे. स्वतंत्र बाण्याचे, निर्भिड वृत्तीचे कठोर प्रशासक म्हणून अनिल पवार हे प्रशासकीय वर्तुळात ओळखले जातात.

वसई -विरारच्या रखडलेल्या नागरी प्रकल्पांना चालना देणे तसेच महापालिकेच्या कारभारात शिस्त आणणे याला त्यांचे प्राधान्य असणार आहे. एकीकडे वाढते कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आणणे आणि त्याचबरोबर दुसरीकडे शहराच्या विकासाला चालना देणे अशा दुहेरी आव्हानांचा सामना नवनियुक्त आयुक्त अनिल पवार यांना करावा लागणार आहे.