अजून १५ ते २० दिवस शाळा बंदच राहणार!

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

Rajesh Tope said will not relax the mask use but cm thackeray soon announce relax restrictions before Gudi Padwa

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी 15 ते 20 दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. यावेळी मंत्री टोपे म्हणाले. कोरोना कमी होतोय असे समजू नये. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. बुधवारी राज्यात 46 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 14 टक्के कोरोनाबाधित लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. जानेवारीत मृत्यू दर 0.3 टक्के आहे.

राज्यात लसीकरणाचे प्रमाण घटत आहे ही चिंताजनक बाब आहे. सध्या राज्यात रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत आहे. आधी हे प्रमाण 9 ते 10 लाख होते. लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांसह आयुक्तांनी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लसीकरणाचे प्रमाण घटत असल्यामुळे कडक पावले उचलावी लागतील.

लसीकरणासाठी राज्य पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्राकडे लशींची मागणी करण्यात येणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यावेळी कोव्हिशिल्डचे 60 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 40 लाख डोस देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल. राज्यात सध्या पहिला डोस घेतलेले 90 टक्के तर दुसरा डोस घेतलेले 62 टक्के लोक आहेत.

भीती बाळगण्याचे कारण नाही
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी भीती बाळगण्याचे कारण नाही. परंतु, काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.