घरताज्या घडामोडीसनदी अधिकारी डॉ. अश्विनी जोशींचे बदली आदेश रद्द; अजूनही नवीन जबाबदारी नाहीच!

सनदी अधिकारी डॉ. अश्विनी जोशींचे बदली आदेश रद्द; अजूनही नवीन जबाबदारी नाहीच!

Subscribe

राज्याच्या प्राथमिक शिक्षण परिषदेच्या संचालक पदावरून अश्विनी जोशींना पायउतार करून त्या जागी शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची बदली करण्यात आल्यापासून ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांना कोणत्याही पदाची जबाबदारी देण्यात आली नव्हती. नुकतेच त्यांची पेट्रोकेमिकलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच हे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत सामान्य प्रशासन विभागात बदली झालेल्या डॉ. सुधाकर शिंदे यांचे देखील बदली आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही अश्विनी जोशी यांचे पोस्टिंग आदेश प्रलंबितच असून त्यांच्यावर कोणतीही नवीन जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.

२००६ सालच्या आय ए एस अधिकारी असलेल्या अश्विनी जोशी या २०१४ ते २०१९ या भाजप सरकारच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्हाधिकारी, मुंबई जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांच्या कठोर शिस्तीमुळे राज्यातील मद्य सम्राटांचे धाबे दणाणले होते. त्यावेळी भाजप सरकार मधील दोघा मंत्र्यांनीच अश्विनी जोशी यांच्या बदलीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावला होता. त्यामुळे अखेरीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोशी यांना उत्पादन शुल्क आयुक्त पदावरून मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त केले होते. मात्र त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात सत्तांतर झाले आणि शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीचे ठाकरे सरकार सत्ता स्थापन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर दोन तीन आठवड्यात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून अश्विनी जोशी यांची उचलबांगडी करत त्यांना शिक्षण विभागात समग्र शिक्षा अभियानाच्या प्रकल्प संचालक पदी नियुक्त केले.

- Advertisement -

मात्र या बदली आदेशानंतर काही महिन्यातच अश्विनी जोशी यांची पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारने शिक्षण विभागातून उचलबांगडी करत त्यांना पेट्रोकेमिकल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्त केले होते. काही दिवसांपूर्वी केलेल्या या नियुक्तीला आज पुन्हा एकदा राज्य सरकारने रद्दबादल ठरवत अश्विनी जोशी यांना पुढील काही काळ तरी पुन्हा एकदा वेटिंग वर ठेवले आहे.

अश्विनी जोशी आणि सुधाकर शिंदे यांच्यासंदर्भातल्या आदेशांसोबतच इतरही चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार राहुल द्विवेदी यांची समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर शांतनू गोयल यांची नागपूरला मनरेगाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यासोबत एम. व्ही. मोहिते यांची वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय अजित पाटील यांची सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -