घरमुंबईपरदेशात फिरण्याचे स्वप्न पडले महाग

परदेशात फिरण्याचे स्वप्न पडले महाग

Subscribe

18 जणांना २१ लाखांना गंडा

काही दशकांपूर्वी अभिनेते शक्ती कपूर आणि कादरखान यांची भूमिका असलेला ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ नावाचा एक विनोदी चित्रपट आला होता. या चित्रपटांत शक्ती कपूर आणि कादरखान हे बोगस पर्यटन कंपनी स्थापन करून त्याची मेंबरशीप देऊन लोकांना परदेशात फिरायला नेण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून रक्कम उकळतात. त्यानंतर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एका छोट्या लाँचमध्ये परदेशात पर्यटनाची हौस असलेल्यांना बसवून त्यांना समुद्रात रात्रभर फिरवून दुसर्‍या दिवशी मुंबईतल्या मालाड समुद्रकिनारी नेले जाते. तिथे गेल्यावर रात्रभर प्रवासकरून आपण दुबईला आल्याचे सांगून मुंबईतल्याच एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यावर या हौशींना उतरवले जाते. चित्रपटातील अशाच फसवणुकीच्या प्रसंगासारखा प्रकार वसईत घडला आहे. परदेशात फिरायला पाठवतो सांगून कंपनीची मेंबरशीप देत १८ जणांची २१ लाख १६ हजार ५०० रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुक्रवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात कंपनीच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील दोघांना पकडले आहे.

वसई पश्चिमेकडील अंबाडी रोडवर असलेल्या गुरुद्वाराच्या बाजूला वर्ल्ड टूरियो नावाची कंपनी काही जणांनी थाटली होती. या कंपनीच्या माध्यमातून मार्च ते जूनपर्यंत लोकांना मेंबरशीप देऊन दरवर्षी 7 दिवस भारतात किंवा परदेशात गेल्यावर हॉटेलमध्ये राहण्याची, खाण्याची आणि फिरण्याची सेवा देण्यात येईल. असे आमिष दाखवून १८ जणांकडून रक्कम घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात कोणतीही सेवा न देता मेंबरशीपसाठी दिलेले पैसे सुद्धा परत दिले नाहीत. पैसे घेतलेल्या लोकांना कंपनीचे चेक देण्यात आले होते. पण हे चेक बँकेतून बाऊन्स केले होते. आतापर्यंत 18 जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून मेंबरशीपच्या नावाखाली 21 लाख 16 हजार 500 रुपये घेतले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर यातील अश्विन मंगच्चन यांनी शुक्रवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आलेल्या तक्रारीवरून मनोज वैलतचंद मिश्रा, कौशल दुबे, सुशील तिवारी, जुबेदा जलाल शेख, अनिकेत तायडे, मुकेश मौर्या आणि स्वप्नील श्रीधर चिखले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून मनोज आणि स्वप्नील याला अटक केली आहे.

- Advertisement -

मॉल किंवा गर्दीच्या ठिकाणी हे कंपनीच्या नावाने कुपन भरून घ्यायचे. नंतर फोन करून तुम्हाला लकी ड्रा लागला असून परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. असे सांगून कार्यालयात बोलावून मेंबरशीप भरून घ्यायचे. आतापर्यंत 18 लोकांना यांनी फसवले असून तीन ते चार जणांचे अर्ज पोलीस ठाण्यात आले आहे. या टोळीने बर्‍याच लोकांना फसवले असल्याची शक्यता आहे.
– राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -