घरमुंबईनिराधारांना आधारासाठीचा ‘चिराग’ अ‍ॅप अंधारात

निराधारांना आधारासाठीचा ‘चिराग’ अ‍ॅप अंधारात

Subscribe

दोन वर्षांत १७५ तक्रारींपैकी फक्त 25 तक्रारींचे निराकरण

राज्यातील रस्त्यांवर, पुलांखाली, सार्वजनिक पार्कमध्ये अनाथ किंवा पालकांसोबत राहणार्‍या समस्याग्रस्त बालकांच्या शोषणाविरोधात दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून चिराग नावाचे एक मोबाईल अ‍ॅप सुरु करण्यात आले होते. मात्र, या चिराग अ‍ॅपला कमी प्रतिसाद मिळाला आहे. दोन वर्षांत या अ‍ॅपवर केवळ १७५ तक्रारी आल्या असून या तक्रारींपैकी आयोगाने फक्त २५ तक्रारींचे निराकरण केले आहे. त्यामुळे निराधार बालकांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चिराग अ‍ॅपला अल्प प्रतिसाद लाभत आहे.

बालकांचे हक्क आणि सुरक्षा या विषयांसाठी काम करणार्‍या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने आतापर्यंत अनेक जनजागृती अभियान राबवले आहेत. दोन वर्षांपूर्वी असाच एक प्रयोग महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने केला होता. राज्यातील रस्त्यांवर, पुलाखाली, सार्वजनिक पार्कमध्ये अनाथ किंवा पालकांसोबत राहणार्‍या समस्याग्रस्त बालकांच्या शोषणाविरोधात तक्रारी करण्यासाठी आणि रस्त्यावर राहणार्‍या मुलांचे सशक्तीकरण आणि संरक्षण व्हावे यासाठी आयोगाने एक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चिराग नावाचे अ‍ॅप सुरू केले होते. हा अ‍ॅप सुरू होऊन आज दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र पाहिजे तितका प्रतिसाद या चिराग अ‍ॅपला मिळत नाही आहे. ९ नोव्हेंबर २०१६ रोजी मोठ्या थाटामाटात महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते चिराग अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला होता. वृत्तपत्रांतून या अ‍ॅपबद्दल मोठ्या जाहिरातीसुद्धा देण्यात आल्या होत्या. मात्र दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. यंत्रणा सांभाळण्यासाठी आयोगा जवळ प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अ‍ॅपला युजर्सचाही अल्प प्रतिसाद                                                                                     बालकांच्या अधिकारांचे संरक्षण कसे होईल तसेच या हक्कांचे संरक्षण करण्याची यंत्रणा व जनतेमध्ये सुसंवाद कसा साधला जाईल, बालकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्काची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दीष्ट ठेवून हे अ‍ॅप बनवण्यात आले होते. परंतु, अ‍ॅपला युजर्सचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. या चिराग अ‍ॅपचे युजर १ हजार आहेत.

अ‍ॅप इंग्रजीत असल्याने कमी प्रतिसाद                                                                                   महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चिराग अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपला तयार करण्यासाठी २ लाख रूपये इतका खर्च आला आहे. संपूर्ण अ‍ॅप ही इंग्रजीत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक वापर करू शकत नाही. त्यामुळे या चिराग अ‍ॅपची भाषा मराठी करण्याची मागणी सुद्धा अनेक नागरिकांनी केले आहे. मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -