घरमुंबईटीमटीच्या १७० बसेस धावल्याच नाहीत

टीमटीच्या १७० बसेस धावल्याच नाहीत

Subscribe

१७० बसेस आगारातच राहिल्याने नुकसान

ठाणे परिवहन सेवेच्या जीसीसी पद्धतीने परिवहनच्या बसेस चालविणार्‍या कंत्राटी वाहन चालकांनी मंगळवारी सकाळीच दसर्‍याच्या सण असतानाही पगारच झाला नसल्याने अचानक काम बंद आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली. पहाटेपासून प्रवाशांना बससेवा देणार्‍या परिवहनची पहिली बस सकाळी 9ः30 वाजण्याच्या सुमारास बाहेर पडली. दसर्‍यानिमित्त बहुतेकांना सुट्टी असल्याने याचा जास्त परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला नसला तरी जवळपास 170 बसेस आगाराबाहेर न पडल्याने परिवहनचे काही प्रमाणात नुकसान झाले. यातील नेमके किती नुकसान झाले, आहे याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान पालिका प्रशासनाच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न देखील काही अंशी निकालात काढण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे .

ठाणे परिवहनच्या ताफ्यात परिवहन सेवेच्या मालकीच्या बसेसशिवाय कंत्राटी (जीसीसी) पद्धतीने चालणार्‍या बसेसची संख्या ही 500 पर्यंत आहे. या बसेसवर कंत्राटी पद्धतीने वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोज परिवहनच्या वागळे, मुल्ला बाग आणि कळवा आगार अशा तीन आगारांमधून 190 बसेस सेवेसाठी बाहेर पडतात. तर सुट्टीच्या दिवशी 190 बसेस बाहेर न काढता 170 च्या आसपास बसेस बाहेर काढल्या जातात.

- Advertisement -

मात्र मंगळवारी सकाळीच दसर्‍याचा सण असतानाही कर्मचार्‍यांचे वेतन न झाल्याने कंत्राटी वाहनचालकांनी अचानकपणे काम बंद केल्याने कोणत्याच आगारामधून एकही बस रस्त्यावर उतरली नाही. रोज पहाटे साडेचारला बसेस आगाराबाहेर यायला सुरुवात होते. मात्र सकाळचे साडेनऊ वाजले तरी बसेस आगारातच होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होता. त्यानंतर साडेनऊ वाजता बसेस बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळाला. दुसरीकडे साडेआठवाजताच बसेस रस्त्यावर उतरवल्याचा दावा बस प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.

वाहनचालकांनी काम बंद केल्याचे समजताच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या कामगारांबरोबर त्वरित चर्चा करण्यात आली. येत्या दोन दिवसांत वेतनाविषयी तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. मात्र या कंत्राटी वाहन चालकांचा केवळ वेतनाच प्रश्न नसून इतर काही समस्याही आहेत. या सर्व प्रश्नांवर एकत्रित तोडगा काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -