घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणूक प्रचारापासून कलाकार दूर

विधानसभा निवडणूक प्रचारापासून कलाकार दूर

Subscribe

मोठ्या पक्षांकडून स्टार प्रचारकांवर दबाव

चित्रपटसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येतो. मात्र यंदाच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काही मोठ्या राजकीय पक्षांच्या दबावामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी हे कलाकार नकार देत आहेत. तसेच काही राजकीय नेत्यांचे कलाकारांशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे हे संबंध कुठे खराब होऊ नयेत म्हणून सुप्रसिध्द अभिनेते-अभिनेत्रींनी निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चित्रपट कलाकार दिसले नाहीत तर आश्चर्य वाटायला नको. हिंदी, मराठी चित्रपट, मालिका अभिनेते, अभिनेत्री यांना असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा अनेक राजकीय नेते मोठ्या खुबीने निवडणूक प्रचारासाठी वापर करून घेतात.

निवडणूक प्रचारासाठी गर्दी जमावी म्हणून या अभिनेते, अभिनेत्रींना आणले जाते. त्यांना पाहायला लोक येतात आणि उमेदवाराचा आयता प्रचार होतो. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी अभिनेते, अभिनेत्रींना कमालीची मागणी असायची. या कालाकारांना निवडणूक प्रचारासाठी उमेदवार अथवा राजकीय पक्ष काही मानधनही देत असत. पदयात्रा अथवा प्रचार फेरीत किती वेळ सहभागी व्हायचे यावरून किमान 50 हजार रुपये ते एक लाखांपर्यंत सिनेमासृष्टीतील कलाकारांना मानधन मिळत होते. निवडणुकीत कलाकारांना अशाप्रकारे पैसे मिळत असल्यामुळे कलाकारही मोठ्या उत्साहाने प्रचारात सहभागी होत होते.

- Advertisement -

मात्र 2014 सालापासून या कलाकारांनी निवडणूक प्रचारात सहभागी होण्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मराठी, हिंदी कलाकार प्रचारापासून लांब राहिलेले दिसतात. एकाचा प्रचार केला तर दुसरा नाराज होणार. यामुळे सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करू पाहाणार्‍या कलाकारांनी प्रचार करायचाच नाही असा पवित्रा घेतला असल्याचे समजते. तर काही पक्षाहकडून कलाकारांनी प्रचार करू नयेत,यासाठी दबाव टाकण्यात येत आहे अशी माहिती एका सुप्रसिध्द अभिनेत्याच्या खासगी सचिवाने दिली आहे.

राजकीय पक्षांकडून दबाव
निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कलाकारांना शोधण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र कलाकार या वेळी प्रचारापासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. त्याचे कारण म्हणजे कोणत्याही कलाकाराला राजकीय नेत्यांशी आपले संबंध दुखवायचे नाहीत. एकाचा प्रचार करून दुसर्‍याला नाराज करायचे नाही. विशेषत : अशावेळी जेव्हा चित्रपट कलाकारांना मिळणार्‍या कामाच्या संधी दिवसेंदिवस कमी होत आहेत. पुन्हा अडीअडचणीच्या काळात जे सत्तेत असतात त्यांच्याकडेच मदतीला जावे लागते. त्यामुळे त्यांना दुखवून कसे चालत नाही. पण सत्ते कोण येईल हे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगता येत नाही. त्यापेक्षा कोणाचाच प्रचार न केलेला बरा, असे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

- Advertisement -

सोशल मीडियाची भिती
निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यानंतर चित्रपट कलाकारांनी त्याची धास्ती घेतली आहे. एका उमेदवाराचा प्रचार केला तर त्याच्या विरोधी असलेल्या उमेदवाराचे कार्यकर्ते नाराज होतात. ते सोशल मीडियावर त्या कलाकाराला अतिशय वाईटरित्या ट्रोल करतात. २०१४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हे प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यामुळे त्या अभिनेता, अभिनेत्रीची प्रतिमा डागाळते. त्याचा परिणाम त्यांना मिळणार्‍या कामांवर होतो. त्यापेक्षा निवडणूक प्रचारापासून लांब राहिलेले बरे, अशी भूमिका अनेक कलाकारांनी घेतली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -