घरमहाराष्ट्र१० रुपयांत जेवणाची थाळी

१० रुपयांत जेवणाची थाळी

Subscribe

देश घडवणार्‍या शेतकर्‍याला आता कर्जमाफी नको, तो कर्जमुक्त झाला पाहिजे. सत्ता येताच आम्ही त्याचा सातबारा कोरा करण्याबरोबरच गरीबांना १० रुपयात जेवणाची थाळी, एक रुपयात हृदयरोग आणि मधुमेह चाचणी आणि ३०० युनिटपर्यंतच्या वीज बिलात सवलत देणार आहोत, अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी केली. शिवसेनेच्या परंपरागत दसरा मेळाव्यात उध्दव बोलत होते. युतीच्या जाहीरनाम्याची घोषणा होण्याआधीच उध्दव यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात सवलतीच्या घोषणा करत भाजपच्या पुढे एक पाऊल टाकले आहे. ग्रामीण विभागात विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवासाची सवलत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. देशातील युवाऊर्जेचा योग्य ठिकाणी उपयोग करून न घेतल्यास ही शक्ती युवाबॉम्ब म्हणून देशाला महाग पडेल, असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला.

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा उल्लेख करताना उध्दव यांनी अयोध्येच्या वादावर कोणी बोलू नका, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. हे प्रकरण न्यायालात आहे. न्यायालयाने न्याय दिला तर आनंदच आहे. राम मंदिर आमच्या राजकारणाचा विषय नाही. त्यासाठी आम्हाला राम मंदिर नको. न्यायालयात दाद मिळणार नसेल तर विशेष कायदा करा आणि अयोध्येत राम मंदिर उभारा, असे आवाहन त्यांनी केंद्रातील सरकारला केले. प्राण जाए पर वचन न जाए, या नीतीने ते आम्ही करायला लावू,आमचे ते वचन आहे, असे उध्दव म्हणाले. देशावर प्रेम करणार्‍यांमध्ये मुस्लिमही असतील तर भांडण कशाला?

- Advertisement -

कोणाला वाटत असेल शिवसेना झुकली, त्या भ्रमात कोणी राहू नये, असे सूचवताना उध्दव यांनी तुम्ही आता महाराष्ट्राची अडचण सोडवा. धनगरांना आरक्षण द्या, मुस्लिमांनाही हक्क मिळवून देऊ. महाराष्ट्र हा हाजी हाजी करणारा नाही. पाठीत वार करणार्‍यांचा कोथळा काढणार्‍यांची आमचे शिवसैनिक ही अवलाद आहे. ती माझी ढाल आणि तलवारही आहे. चांगल्याला आम्ही चांगलेच म्हणतो. महाराष्ट्राचे भले करण्यासाठी एकत्र आलो आहोत. तेव्हा कोणीही कुठेही झुकलेले नाही, असे त्यांनी कोणाचे नाव न घेता बजावले. या देशावर राज्य कोणी करायचे पवारांनी की मुलायम सिंगांनी, नितीशकुमारांनी की मायावतींनी? अस्थिर लोकसभा देशाला तारू शकली नसती. हे चालले नसते म्हणूनच आम्ही भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला. आम्ही काँग्रेसच्या मागे कदापि उभे राहणार नाही, असे उध्दव म्हणाले.

शिवसेनेचा वचननामा
•शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सातबाराही होणार कोरा
•राज्यभरात सर्वांसाठी १० रुपयांत जेवणाची थाळी
•३०० युनिटपर्यंतच्या वीजेमध्ये ३० टक्के कपात
•सशक्त महाराष्ट्रासाठी १ रुपयात आरोग्य चाचणी
•ग्रामीण भागातील महिला-विद्यार्थींना मोफत बससेवा
•युवाशक्तीची क्रयशक्ती रोजगार देत भागवणार

- Advertisement -

भाजपला कानपिचक्या
•पाठीत वार कराल तर कोथळा बाहेर काढू
•डोक्यात जर सत्तेची हवा गेली तर रस्त्यावरचा
•कुत्रा देखील सोबत येणार नाही
•सुडाचे राजकारण कुणी केल्यास त्याला तोडून मोडून
•ठेवल्याशिवाय गप्प राहणार नाही
•कोणत्याही अपक्षेशिवाय सोबत येतो तो मित्र
•सत्ता येते सत्ता जाते म्हणून ऊतू नका मातू नका
•युती म्हटली की तडजोड आलीच आम्ही वाकलो नाही

1995च्या घोषणांची पुनरावृत्ती
१९९५मध्ये शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर येण्याआधी शिवसेनेने १ रुपयांत झुणका भाकर देण्याची घोषणा केली होती. सत्ता आल्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही झाली, मात्र कालांतराने झुणका भाकर केंद्रे बंद पडली. त्याच वेळी रेशनिंगच्या दुकानांमध्ये मिळणार्‍या गहु, तांदूळ, साखर, पामतेल, डाळ या वस्तूंचेही दर वाढू न देणार नसल्याची घोषणा केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -