घरमुंबईवादग्रस्त फेसबुक पोस्टवरून एकाची हत्या

वादग्रस्त फेसबुक पोस्टवरून एकाची हत्या

Subscribe

वादग्रस्त फेसबूक पोस्टच्या रागात जाब विचारण्यासाठी गेलेल्या नगरसेविकेच्या पतीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

फेसबुकवर नगरसेविकेविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या वादातून नगरसेविकेच्या पतीने दोघांना केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी नगरसेविकेच्या पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नगरसेविकेच्या पतीसह ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करून मारेकरी आणि नगरसेविकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जाफर उर्फ बाबूभाई शेख (४४) असे मारहाणीत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या मारहाणीत मोहम्मद रफी जखमी झाला आहे. वांद्रे पूर्व भारत नगर येथील बसेरा सोसायटीमध्ये राहणारा मोहम्मद रफी हा दर शुक्रवारी येथील अनधिकृत बांधकाम तसेच बिल्डरविरुद्ध फेसबुकवर व्हिडीओ बनवून टाकत होता. अशाच एका फेसबुक पोस्टमध्ये जाफरने येथील नगरसेविका आणि बिल्डरचे साटेलोटे असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट रफी फेसबुकवर सतत टाकत होता. स्थानिकांमध्येही या फेसबुस पोस्टची चर्चा होती.

- Advertisement -

शुक्रवारी मोहम्मद रफी याने पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट टाकली. त्यामुळे संतापलेला नगरसेविकेचा पती शालीम कुरेशी, पाच-सहा सहकाऱ्यांसह मोहम्मद रफीला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बसेरा सोसायटीत गेला. या दरम्यान मोहम्मद रफी आणि शालीम कुरेशी यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी नगरसेविकेचा पती शालीम आणि त्याचे सहकारी मोहम्मद रफीला मारहाण करीत असताना त्याठिकाणी बसेरा सोसायटीत राहणारे जाफर उर्फ बाबूभाई शेख यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे शालीम कुरेशी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जाफर उर्फ बाबूभाई यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

नगरसेविकेच्या पतीसह चौघे ताब्यात

दरम्यान स्थानिक रहिवाशांनी मोहम्मद रफी आणि जाफर यांची कुरेशीच्या तावडीतून सुटका केली. यावेळी जखमी झालेल्या दोघांना वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान जाफर उर्फ बाबूभाईचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेविकेचा पती शालीम कुरेशीसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आले आहे. तसेच या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना गाडेकर यांनी दिली.
या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आणि बिल्डर आणि नगरसेविकला या गुन्ह्यात अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -