घरमुंबई100 टक्के लसीकरणाच्या दिशेने...

100 टक्के लसीकरणाच्या दिशेने…

Subscribe

गेली पावणेदोन वर्षे जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोना विषाणूपासून स्वसंरक्षण करण्यासाठी लसीकरण हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे. अर्थात लसीकरण झाल्यानंतर म्हणजेच लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोना होणारच नाही याची कोणतीही 100 टक्के हमी कोणत्याही लस उत्पादन करणार्‍या कंपन्या देत नसल्या तरीदेखील कोरोनाचा जीवघेणा संसर्ग आणि त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी करण्याचे महत्वपूर्ण काम लसीकरणाने केले आहे. याबाबत आता कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. मुंबईसह महाराष्ट्राची तसेच देशातही कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होत चाललेली घट आणि कमी आकडेवारी पाहता भारताची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरू झाली आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये व मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मराठवाडा, खानदेश तसेच अगदी कोकणापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीयरित्या घट होत आहे.

ही निश्चितच सर्वसामान्य जनतेसाठी तसेच राज्य आणि केंद्र सरकारसाठी मोठी दिलासादायक बाब आहे असंच म्हणावं लागेल. अर्थात याचे सर्वात मोठे श्रेय हे राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान अत्यंत यशस्वीपणे आणि अखंडपणे राबवणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचे, त्यांना मदत करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचे आणि त्याचबरोबर राजकीय हित म्हणून का असेना, परंतु सर्वच राजकीय पक्षांनी राबवलेल्या लसीकरण मोहिमांमुळे कमीत कमी त्यात या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे तरी 100 टक्के लसीकरण आत्तापर्यंत झाले आहे. या लसीकरण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही आता कमी कमी होताना दिसत आहे.

- Advertisement -

आजच देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी एक ट्विट करत 99 कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे आणि काही दिवसातच भारतातील शंभर कोटी जनता लसवंत झालेली असेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही निश्चितच अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे ही ज्या जीवघेण्या विषाणूमुळे मानवाचे संपूर्ण आयुष्यच गेले दीड पावणे दोन वर्षे पूर्णपणे ठप्प पडले होते. त्या जीवघेण्या विषाणूवर अगदी शंभर टक्के नसले तरी 99 टक्के मात्र या विषाणूवर मात करण्याइतपत यश मानवाने प्राप्त केले आहे. त्यामुळेच काही महिन्यातच भारतातील 99 कोटी जनता लसवंत झाली हे खरोखरच कौतुकास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्यमंत्री मनसुख मंडवीय तसेच केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांचे यासाठी निश्चितच कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे. केंद्र सरकार बरोबरच महाराष्ट्र सरकारनेदेखील लसीकरणाची गती गेल्या काही दिवसांमध्ये नियोजनबद्ध प्रयत्न करत वाढवली आणि त्यामुळेच महाराष्ट्रातदेखील लसीकरणाला चांगली गती प्राप्त झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्राने विशिष्ट महाराष्ट्र सरकारने यामध्ये जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत त्याचीही दखल घेण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विशेष म्हणजे राज्याचे अत्यंत तडफदार आणि कर्तव्यनिष्ठ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची खरोखरच पाठ थोपटणे गरजेचे आहे. एरवी केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो जनता विरोधी धोरणांवर सडकून टीका करण्याचा अधिकार हा प्रसारमाध्यमांना जनहितासाठी असतो. मात्र, जेव्हा जेव्हा सरकारे मग ती कोणत्याही राजकीय विचारसरणीची असोत ती जेव्हा एखादा प्रकल्प, एखादी योजना, एखादा निर्णय, एखादे अभियान हे जेव्हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अत्यंत तळमळीने राबवतात तेव्हा त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हेदेखील लोकशाहीतील या चौथ्या स्तंभाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या या लसीकरण अभियानात राज्य व केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याचे कर्मचारी असोत, पोलीस कर्मचारी असोत, महसूल कर्मचारी असो की अगदी दिवस-रात्र जनतेसाठी काम करणारे महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे कर्मचारी असो यांचेही या मोहिमेत अमूल्य असे योगदान लाभले असल्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त करणे अत्यावश्यक आहे.

- Advertisement -

नवी मुंबईप्रमाणेच देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर हेदेखील लसीकरण अभियानात अव्वल ठरले आहे. मुंबईत मुंबई महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्र मिळून एकूण 475 केंद्रांवर लसीकरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. आजमितीला दिवसाला किमान 80 हजार ते एक लाख जणांचे लसीकरण प्रतिदिन करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत 18 वर्षांवरील 90 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 86 लाखांवर लाभार्थ्यांचे पहिल्या डोसचे यशस्वीपणे लसीकरण पूर्ण केले आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजनानुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व मुंबईकरांचा पहिला डोस घेऊन पूर्ण होणार आहे तर साधारणपणे 65 टक्के जणांचे दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणदेखील पूर्ण होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने येत्या बारा दिवसात 100 टक्के मुंबईकरांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. दिवाळीपर्यंत मुंबईकर पहिल्या टप्प्यातील लसवंत झालेले असतील अशी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही. लसीकरणाचे आव्हान पेलण्यात वैद्यकीय कर्मचार्‍यांपासून ते पोलीस कर्मचार्‍यांपर्यंत सगळ्यांचे मोठे योगदान आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल खरोखरच यासाठी कौतुकास पात्र आहेत. कारण मुंबई जरी देशाची आणि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असली तरी मुंबईची भौगोलिक आणि सामाजिक रचना जी आहे ती एकसमान नाही. त्यामुळे मुंबईसारख्या अवाढव्य पसरलेल्या शहराचे एवढ्या गतीने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट गाठणे हे निश्चितच सहजसुलभ काम नाही. त्यासाठी मुंबई महापालिकेचे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांचे आणि विशेष करून हे लसीकरण अभियान 16 जानेवारीपासून अखंडपणे न थकता न दमता राबवणार्‍या मुंबई महापालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे अभिनंदनच करायला हवे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेने आता दोन ते अठरा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी नायर रुग्णालयात सुरू करण्यात आलेली ट्रायलदेखील यशस्वी ठरली आहे. त्यामुळे लवकरच या वयोगटातील मुलांचेही लसीकरण मुंबईत सुरू होऊ शकणार आहे ही निश्चितच आनंददायक बाब आहे.

लसीकरणाला गती यावी म्हणून मुंबई महापालिकेचे कर्मचारी आता स्वतः लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यासाठीच मुंबई महापालिकेने गृहनिर्माण संस्थांच्या आवारात तसेच झोपडपट्ट्यांच्या आवारात विशेष लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मुंबई हे सतत धावणारे शहर आहे हे लक्षात घेऊन 1 नोव्हेंबरपासून लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, फेरीवाले, दुकानदार यांच्यासाठी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फिरती लसीकरण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. 86 लाख 29 हजार 807 मुंबईकरांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 48 लाख 85 हजार 304 मुंबईकरांनी लसीचा दुसरा डोस घेऊन पूर्ण केला आहे. असे एकूण १ कोटी 35 लाख 15 हजार 111 एवढे लसीकरणाचे डोस मुंबईमध्ये देण्यात आले आहेत. आणि ही आकडेवारी निश्चितच मुंबईसह महाराष्ट्राला दिलासा देणारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -