घरमुंबईDeep Cleaning Drive : स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री मंगलप्रभात...

Deep Cleaning Drive : स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचे आवाहन

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेली सखोल स्वच्छता मोहीम ही व्यापक होत असल्याचा आनंद आहे. स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मुंबई महापालिकेच्या वतीने ‘एम’/पूर्व आणि ‘एम’/पश्चिम विभागात रविवारी पार पडलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा… BMC : गोवंडीत अनधिकृत मांसविक्री करणाऱ्यांविरोधात मनपाची कारवाई; चार हजार किलो मांस जप्त

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने सखोल स्वच्छता मोहीम म्हणजेच डीप क्लिनींग ड्राईव्ह मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी पार पडलेल्या स्वच्छता मोहीमेअंतर्गत गोवंडी स्थानक (पूर्व) ते गावदेवी चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक (पांजरापोळ सर्कल), शनी मंदिर, गोवंडी पूर्व, नारायण गणेश आचार्य उद्यान (डायमंड गार्डन), स्वातंत्र्यसैनिक उद्यान (चिमणी गार्डन), चेंबूर व मुलुंड आदी भागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत स्थानिक ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

या मोहिमेच्या सुरुवातीला चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता केल्यानंतर मान्यवरांकडून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुंबईतील मोठ्या रस्त्यांची ज्याप्रमाणे व्यापक स्तरावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता केली जात आहे, अगदी त्याचप्रमाणे गल्लीबोळातील रस्ते स्वच्छ करण्याची कार्यवाही यापुढे करण्यात येईल, असे पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले की, सखोल स्वच्छता मोहीम ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अभिनव मोहीम आहे. शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून ही मोहीम व्यापक चळवळ बनली आहे. मात्र, इतक्यावरच समाधानी न होता सदर मोहीम अविरत आणि सक्षमपणे सुरू राहील, याकडे प्रशासनातील प्रत्येक घटकाने चोखपणे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

या स्वच्छता मोहिमेत मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ 5) हर्षद काळे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाणे आणि स्थानिक मान्यवर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -