घरमुंबईमृतांचीहि अवहेलना

मृतांचीहि अवहेलना

Subscribe

दिवा रेल्वे फाटकाजवळील आगासन गेटवर रविवारी रेल्वेच्या धडकेत मृत्यूमुखी  पडलेल्या एका प्रवाशाचे मृतदेह रूग्णवाहिकेअभावी एका खाजगी टेम्पोच्या  सहाय्याने ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले

ठाण्याच्या पुढे वाढत्या शहरीकरणामुळे कळवा, दिवा, कोपर, डोंबिवली, कल्याण या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येबरोबरच या मार्गावरील अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दीड वर्षात ठाणे-कल्याणदरम्यान तब्बल एक हजार 308 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांची मालिका अशीच सुरू असताना या स्थानकांवर रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.
अगदी रुग्णवाहिकांची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कळवा, दिवा, कोपर या रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाल्यास जीआरपी पोलिसांना जखमी व मृतदेहांना चक्क टेम्पोमधून रूग्णालयात न्यावे लागत आहे. विशेष म्हणजे यासाठी रेल्वे पोलिसांना स्वत:च्या पदरचे पैसेही खर्च करावे लागत आहेत. प्रवाशांकडून पोलिसांच्या या कृतीचे कौतुक केले जात असले तरी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत प्रचंड संतापही व्यक्त केला जात आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल हे मुंबईतले असतानाही त्यांना ही बाब लक्षात येऊ नये, याचे आश्चर्य रेल्वे प्रवाशांना आहे.
 दिवा रेल्वे स्थानकांच्या हद्दीत येणार्‍या आगासन गेटजवळ अप लाईन मार्गावर रविवारी 26 वर्षीय तरुणाला लोकलची धडक लागल्याने तो जखमी अवस्थेत पडून होता. त्याच्या कानातून रक्त येत होते. या घटनेची माहिती दिवा रेल्वेस्थानकांच्या स्टेशन मास्टर संतलाल सिंग यांना मिळताच त्यांनी तातडीने जीआरपी पोलिसांना कळवले. जीआरपी पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ठाणे सिव्हिल रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी दिवा रेल्वेस्थानकालगत रुग्णवाहिका नसल्याने जीआरपी पोलिसांनी खासगी वाहनाचा शोध घेतला. परंतु खासगी वाहनचालक मृतदेह घेऊन जाण्यास नकार देत होते. अखेर एका सामान भरलेल्या टेम्पोचालकाने मृतदेह नेण्याची तयारी दर्शवली. परंतु त्यासाठी जीआरपी पोलिसांना स्वत:च्या खिशातील 700 रुपये मोजावे लागले. या घटनेचा काही प्रवाशांनी व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. रेल्वेच्या या संपूर्ण कारभारवर सर्वत्र एकच टीका झाली. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची अद्यापही ओळखही पटलेली नाही.
मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर रेल्वेच्या रुग्णवाहिका तर काही स्थानकांवर राज्य सरकारच्या रुग्णवाहिका आहेत. मात्र काही वेळा अपघात झाल्यावर परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णाला खासगी वाहनातून हॉस्पिटलमध्ये नेण्यात येेते, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
रेल्वे स्थानकावर हमालच नाही
रेल्वे अपघातातील जखमीला किंवा मृत झालेल्या व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी चार हमाल आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था स्टेशन मास्तरने करायची असते. मात्र या परिसरात हमालच नसल्याने जीआरपीच्या जवानांना जखमी किंवा मृतांना उचलून न्यावे लागते.

ठाणे – कल्याण रेल्वे अपघात

स्ट्रेचर-रूग्णवाहिकेचा पत्ता नाही
खाजगी टेम्पोतून न्यावे लागतात मृतदेह
जीआरपी करतात शववाहनाचा खर्च
मंत्री गोयल मुंबईचे तरी रेल्वे दुर्लक्षितच
जानेवारी २०१७ 
ते जुलै २०१८ 
मृतांची संख्या 
कल्याण = ५३६
ठाणे = ५११
डोंबिवली = २६१
एकूण = १,३०८ 
मध्य रेल्वेवरील दिवा हे मोठे स्थानक आहे. अशा स्थानकांवर 24 तास रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे. मात्र या स्थानकावर एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अपघातात जखमी होणार्‍याला गोल्डन अवर्समध्ये उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही रेल्वे प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे रुग्णवाहिकेची मागणी करतो. पण एकाही अधिकार्‍याला पान्हा फुटला नाही. नेत्यांनी तर याकडे सोयीने दुर्लक्ष केले आहे. यामुळे मृतांना खाजगी टेम्पोच्या सहाय्याने न्यावे लागते. 
 – आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -