रायगडात काँग्रेसच्याही राष्ट्रवादीविरोधात कुरबुरी

जिल्ह्यात सेनेसह समविचार पक्षांशी युती,

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील विस्ताराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेना नेते, माजी मंत्री आनंत गीते यांनी शड्डू ठोकला असताना काँग्रेस पक्षाच्याही त्या पक्षाविरोधातील कुरबुरी वाढू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या सत्तेत सहभाग नसल्यास आम्हाला गृहित धरू नका, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिला आहे.

दोनच दिवसांपूर्वी माजी मंत्री आनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढत्या प्रस्थामुळे महाविकास आघाडीतील इतर सगळेच पक्ष हादरले आहेत. यातील शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत आघाडीचा धर्म राष्ट्रवादीचे नेते पाळत नसल्याचा आरोप केला. हा आरोप करताना गीते यांनी थेट पवारांवर टीका केली. यामुळे महाविकास आघाडीत सारे काही अलबेल नाही, हे उघड झाले.

गीते यांच्या हल्ल्यानंतर आता काँग्रेस पक्षानेही जिल्ह्यात गृहित धरले जात असल्याचे म्हटले अहे. सत्तेत सन्मानजनक वाटा देणार नसाल तर यापुढे गृहित धरू नका, असा इशारा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीला दिला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा माहोल निर्माण होऊ लागला आहे. शिवसेनेबरोबरच काँग्रेस पक्षानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इशारा देताना नाराजी व्यक्त केली. काही लोक आमची मदत घेऊन सत्तेत गेले. नंतर आम्हाला विसरले, असा आक्षेप त्यांनी नोंदवला.

जिल्हा परिषदेत सत्ता मिळवताना काँग्रेसची मदत घेतली, पण नंतर एकही सभापती पद आमच्या पक्षाला दिले नाही, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हटले. आमच्या मदतीने आमदार आणि खासदार झाले, सत्ता मिळवली, पण नंतर आम्हाला फसवले, असा आरोप त्यांनी केला. या फसवणुकीचे शल्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे यापुढील काळात आम्हाला गृहीत धरू नका असे घरत यांनी बजावले आहे. आमच्याकडे आता शिवसेना व इतर समविचारी पक्षांशी आघाडीचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.