घरमुंबईअंतर्गत वादामुळे वडाळा गेला भाजपकडे; श्रध्दा जाधव यांना शिवसेनेतून विरोध

अंतर्गत वादामुळे वडाळा गेला भाजपकडे; श्रध्दा जाधव यांना शिवसेनेतून विरोध

Subscribe

आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासाठी हा मतदार संघ सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये अधिक दु:ख झाले आहे.

‘वडाळा विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहणार’ असे राणा भिमदेवी थाटात शिवसैनिक सांगत सुटले असतानाच पक्षाच्या सेनापतींनी हा बालेकिल्ला भाजपाला आंदण देवून टाकला. विशेष म्हणजे एकेकाळी शिवसेनेशी गद्दारी करणार्‍या काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासाठी हा मतदार संघ सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये अधिक दु:ख झाले आहे.

श्रद्धा जाधवांमुळे मतदारसंघ सोडला?

कोळंबकर यांच्यासाठी निष्ठावान शिवसैनिक असलेल्या श्रध्दा जाधव यांचा पत्ता कापण्यात आला. परंतु अंतर्गत वादामुळेच हा पत्ता कापण्यात आला असून खुद्द शिवसेनेचे खासदार, विभागप्रमुखांसह नगरसेवक हे कालिदास कोळंबकर यांच्या बाजूने उभे राहिल्यानेच हा मतदार संघ भाजपाला सोडून श्रध्दा जाधव यांचे पंख छाटण्यात आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

म्हणून कोळंबकरांना संधी

वडाळा विधानसभा मतदार संघात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कालिदास कोळंबकर हे सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहे. युतीच्या वाटपात हा मतदार संघ कायम शिवसेनेसाठी सोडला जात असे. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाने स्वबळावर ही निवडणूक लढवल्यानंतर कोळंबकर हे विजयी झाले असले तरी भाजपाचे मिहिर कोटेचा हे दुसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. तर शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर फेकली होते. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून शिवसेनेने कोळंबकर यांचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत मतदार संघाची बांधणी केली. परंतु तोच मतदार संघ आता शिवसेनेने भाजपाला सोडून कोळंबकर यांचे पुनर्वसन करण्याची संधी दिली.

खासदार, नगरसेवक, विभागप्रमुखांचा श्रद्धा जाधवांना विरोध

मागील लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार यांच्या प्रचारात कोळंबकर हे सहभागी झाले होते. तसेच त्यांना शिवसेनेत घेण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधात असल्याने कोळंबकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर पक्षप्रमुखांनी हा मतदार संघ कोळंबकर यांच्यासाठी भाजपाला सोडला असल्याचे बोलले जात आहे. श्रध्दा जाधव यांनी दोन वर्षांपासून या मतदार संघाची बांधणी करत असल्या तरी त्यांना विभागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा विरोध होता. खुद्द खासदार राहुल शेवाळे व विभागप्रमुख सदा सरवणकर हे कोळंबकर यांच्या बाजूने होते. त्यातच खासदारांनी वडाळा व धारावी मतदार संघाची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे खुद्द खासदार, नगरसेवक, विभागप्रमुखांना श्रध्दा जाधव यांना उमेदवार द्यायची नव्हती. त्यामुळेच त्यांनी हा मतदार संघ भाजपला सोडण्याची सूचना पक्षप्रमुखांकडे केली असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मंगलप्रभात लोढांची संपत्ती १३१ कोटी; गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पन्न घटले!

मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेल्याचे दुःख

यासंदर्भात विभागप्रमुख सदा सरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी युतीचा हा निर्णय असून पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य करण्याऐवजी त्यांच्या आदेशाचे पालन करणे हेच आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता व राहणार आहे. ज्या कोळंबकर यांना पाडण्यासाठी मी दोन वर्ष मतदार संघ बांधत होते. त्यामुळे कोळंबकर यांना पाडणे हेच शिवसेनेचे स्वप्न होते. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही यापेक्षा हा मतदार संघ भाजपाच्या ताब्यात गेला, याचे मला दु:ख आहे. यापेक्षा वेगळी भावना शिवसैनिकांची नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

श्रध्दा जाधव यांना संघर्षाची किनार

श्रध्दा जाधव यांनी आजवर सर्वच संघर्ष करून मिळवले आहे. सलग सहा वेळा नगरसेवक बनवण्याचा बहुमान मिळवणार्‍या श्रध्दा जाधव यांचा शिवडीतील मतदार संघ गेल्यानंतर अँटॉपहिलमध्ये जावे लागले. परंतु सातमकर यांचा विरोध असतानाही त्यांनी भांडून जागा मिळवली व विजयही मिळवला. त्यापूर्वी महापौर पदही त्यांनी भांडून पदरात पाडून घेतले. एवढे नव्हे तर २०१७च्या निवडणुकीतही त्यांना मतदार संघ मिळू नये म्हणून नंदू विचारेसह आमदार अजय चौधरी यांनी जोरदार विरोध केला होता. तेव्हाही त्यांनी भांडून हा मतदार संघ मिळवला आणि विजयही मिळवला. त्यामुळे आता आमदारकी नाही, तर पक्ष किमान महापालिकेतील महत्वाचे पद तरी पदरात टाकून त्यांचा सन्मान राखते की त्यांना कायमचीच जागा दाखवण्याची रणनिती रचते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -