अखेर तो क्षण आलाच, मुंबईकरांच्या मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल

mumbai metro

मेट्रो २ अ दहिसर ते डी एन नगर मार्गासाठीचे मेट्रोचे डबे अखेर आज गुरूवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. या मेट्रो डब्यांचे उद्घाटन शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चारकोप येथे होणार आहे. भारतीय बनावटीचे असे मेट्रोचे डबे आहेत. पहिल्यांदाच भारतीय बनावटीच्या डब्यांचा वापर मेट्रो सेवेत करण्यात येणार आहे. भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड मॅन्युफॅक्चरींग युनिट बंगळुरू येथून २४ जानेवारीला हे मेट्रोचे डबे रस्ते वाहतूकीने मुंबईच्या दिशेने निघाले होते. अखेर आज सकाळी हे मेट्रोचे डबे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ या मार्गावर येत्या मार्च महिन्यापासून मेट्रोच्या मार्गाचे ट्रायल्स सुरू होणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीएच्या याआधीच्या नियोजनानुसार हे मेट्रो लाईन्सची चाचणी ही १५ जानेवारीला सुरू होणे अपेक्षित होती. पण काही कारणामुळे ही चाचणी रखडली. अखेर ही चाचणी मार्च महिन्यात होईल असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आज मेट्रोचे कोच मानखुर्द येथे दाखल झाल्यानंतर एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांच्या उपस्थितीत मुंबईच्या प्रवेशालाच ढोल ताशाच्या गजरात मेट्रोचे स्वागत करण्यात आले.

याआधीच मुंबईत कोरोनाच्या संकटामुळे मेट्रोच्या कामासाठी अडथळे निर्माण झाले होते. अनेक मजुर हे कोरोना महामारीतील लॉकडाऊनच्या काळात मुंबई सोडून गेल्याने या मेट्रो मार्गांचे प्रकल्प मागे पडले. अखेर अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबईत मजुर परतण्यासाठी सुरूवात झाल्यानंतर मेट्रोची मुंबईतील कामे सुरू झाली.

metro coach

एमएमआरडीच्या या आधीच्या नियोजनानुसार मेट्रो ७ आणि मेट्रो २ या मार्गावरील सेवा ही डिसेंबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण आता नव्या डेडलाईननुसार या मार्गावरील चाचणी ही मार्चमध्ये होईल. त्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो मार्गावर सेवा सुरू होण्यासाठी मे महिना उजाडेल अशी माहिती आहे. मुंबईत सध्या मेट्रो १ मार्गावर घाटकोपर अंधेरी वर्सोवा या मार्गावर मेट्रो धावते. एकुण ११.५ किलोमीटर लांबीची ही मेट्रो आहे.

अनलॉक प्रक्रियेत या मार्गावरही मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत. एमएमआरडीएने संपुर्ण मुंबईत ३३७ किलोमीटरचे नेटवर्क उभारण्यासाठीच्या प्रकल्पांचे नियोजन केले आहे. येत्या २०२६ अखेरीस मेट्रोचे १४ मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणे अपेक्षित आहेत.