घरमुंबईकिल्ले संवर्धक दुर्गमित्रांना देवस्थानाचा विरोध

किल्ले संवर्धक दुर्गमित्रांना देवस्थानाचा विरोध

Subscribe

किल्ले संवर्धनासाठी वसईच्या किल्ल्यात आंदोलन करणार्‍या दुर्गमित्रांना देवस्थानाच्या आडमुठ्या धोरणामुळे रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागल्याची संतापजनक घटना घडली आहे.ऐतिहासिक वसईच्या किल्ल्यात प्री-वेडींग शुटींगच्या नावाखाली केले जाणारे अश्लिल छायाचित्रण, जोडपी,मद्यपी यांच्याकडून केली जाणारी विटंबना, पर्यटनाच्या नावाखाली केल्या जाणार्‍या ओल्या पार्ट्या, टाकला जाणारा प्लास्टीकचा कचरा या सगळ्या घटनांमुळे किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. या प्रकाराकडे किल्ल्यातील पुरातत्व विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी दुर्गमित्रांनी 15 आणि 16 डिसेंबरला आंदोलन केले होते.या आंदोलनात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दुर्गमित्र सहभागी झाले होते. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते.

पहिल्या दिवसानंतर या दुर्गमित्रांनी किल्ल्यातील वर्जेश्वरी मंदिरात रात्र काढण्याचे ठरवले होते. तशी दुर्गमित्रांनी आगाऊ सूचना देवून देवस्थानाकडून परवानगीही मागितली होती.त्यामुळे सर्वजण मंदिरात गेले असता,त्यांना विश्वस्थांनी प्रवेश करण्यास मनाई केली. देणगी द्या आणि मगच आसरा घ्या असा पवित्रा त्यांनी घेतला. तसेच शाळा,कॉलेजमधून येणार्‍या विद्यार्थ्यांकडूनही देणगी घेतली असल्याचा दाखलाही यावेळी विश्वस्तांनी दिला. त्यानंतर ते मंदिराला कुलुप लावून निघून गेले. त्यामुळे दिवसभर अर्धपोटी आंदोलन करणार्‍या दुर्गमित्रांना ती रात्र थंडीत कुडकुडत उघड्यावर काढावी लागली.
या प्रकार उघडकीस आल्यामुळे समस्त वसईकरांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. किल्ल्याचे पावित्र्य टिकवण्याचा प्रयत्न करत असताना दुर्गमित्रांनी नेहमीच या मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांच्याकडून त्या रात्री कोणतेही गैरकृत्य केले जाणे केवळ अशक्य असताना,त्यांना मदत करण्याऐवजी आपली झोळी भरण्याच्या प्रयत्न करणार्‍या विश्वस्तांचा धिक्कार करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -