घरमुंबईमनसेच्या पदाधिकार्‍यांना अटक करा, अन्यथा कामबंद आंदोलन करु

मनसेच्या पदाधिकार्‍यांना अटक करा, अन्यथा कामबंद आंदोलन करु

Subscribe

धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणाऱ्या मनसेच्या पदाधिकार्‍यांना दोन दिवसांत अटक न झाल्यास २४ विभाग कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे.

जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यासह परवाना विभागाच्या अधिकार्‍याला झालेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणी सोमवारी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारत मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या अटकेची मागणी केली आहे. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या या आंदोलनात स्वत: जैन यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी अशाप्रकारच्या राजकीय गुंडांची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा दिला आहे. जैन यांना आता सर्वच विभागांच्या सहाय्यक अभियंता आणि अभियंत्यांचा पाठिंबा मिळत असून दोन दिवसांमध्ये जर मनसेचे विभाग प्रमुख संतोष धुरी यांच्यासह पदाधिकार्‍यांना अटक न झाल्यास २४ विभाग कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन पुकारले जाईल, असाही इशारा युनियनने दिला आहे.

यामुळे दिला कामबंद आंदोलनाचा इशारा

लोअर परळ, वरळी भागातील फेरीवाल्यांवर काय कारवाई केली याचा जाब विचारण्यास गेलेल्या मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग प्रमुख संतोष धुरी यांनी परवाना अधिकारी गवस यांच्यासह जी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. त्यामुळे धुरी यांच्यासह काही पदाधिकार्‍यांविरोधात महापालिकेने एफआयआर दाखल केला आहे. या हल्ल्याचा निषेध म्हणून म्युनिसिपल मजदूर युनियनने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी जी/दक्षिण विभाग कार्यालयात युनियनच्यावतीने आंदेालन पुकारण्यात आले होते. आंदोलनात सफाई कामगारांसह सर्वच कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते देखील उपस्थित होते.

- Advertisement -

२४ विभागांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा

या आंदोलनात सहभागी होऊन जैन यांनी भाषण करत कोणत्याही प्रकारची गुंडागर्दी सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. कोणताही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असो वा कोणीही असो. त्यांचा प्रतिकार करणारच आणि हल्लेखोरांवर कायदेशीर कारवाई करायला भाग पाडू असा असाही इशारा दिला. त्यानंतर २४ विभागांच्या काही सहायक आयुक्त तसेच काही सहायक अभियंता यांनी जैन यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर जैन यांच्या दालनात युनियनच्या पदाधिकार्‍यांसह झालेल्या बैठकीत विभागांचे सहायक अभियंता उपस्थित होते. यामध्ये त्यांनी पोलिसांवर दबाव आणून मनसेच्या पदाधिकार्‍यांना अटक करायला भाग पाडले जाईल, असे ठरवण्यात आले. यावेळी हल्लेखोरांना दोन दिवसात अटक करण्याची मुदत देण्यात आली. जर दोन दिवसांमध्ये अटक न झाल्यास २४ विभागांमध्ये कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा या बैठकीत इतर कार्यालयातील अभियंत्यांनी दिला.

जी/दक्षिण विभागात कामबंद आंदोलन सुरु असतानाच मनसेच्यावतीने फेसबूक लाईव्ह करून जैन चोर असल्याचा घोषणा देण्यात आल्या. फेरीवाल्यांवर कारवाई न करणार्‍या जी/दक्षिण विभागाचे चौर आणि भ्रष्ट सहायक आयुक्तांचा निषेध अशा मजकुराचे फलक लोअर परळ भागांमध्ये लावून निषेध नोंदवण्यात आला. याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता, आधी काम करा, मग काम बंद आंदोलन करा, असे त्यांनी सांगितले. यापुढे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन चोर अशाप्रकारच्या हॅश टॅग चालवूनच मोहिम चालवली जाईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

वाचा – मनसेच्या देशपांडे, धुरींची सहायक आयुक्तांना धक्काबुक्की, FIR दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -