घरमुंबईपश्चिम, मध्य रेल्वेला हाय अलर्ट; सर्व स्थानकांवरील सुरक्षेत वाढ

पश्चिम, मध्य रेल्वेला हाय अलर्ट; सर्व स्थानकांवरील सुरक्षेत वाढ

Subscribe

मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्वच स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची नजर असणार आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांवरील कारवाईनंतर आणि पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्वच स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची नजर असणार आहे. शिवाय मुंबईतील वाहतूकीची इतर साधनं म्हणजेच रिक्षा, टॅक्सीचालक यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जागोजागी पोलिसांचा कडक पहारा असून श्वान पथकांसह प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जात आहे.

मुंबईसह चार राज्यांवर नजर 

मुंबईसह अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्येही पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट देण्यात आला असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात हा इशारा देण्यात आला आहे. आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम स्थानकांवरील सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्यांच्या गाड्यावर करडी नजर ठेवण्याचा आदेश दिला आहे. विशेष करुन जम्मूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या ट्रेन्सवर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

सर्व सुरक्षा विभागांना संवेदनशील यादी

चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाने २२ फेब्रुवारी रोजी मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवलं होते. या पत्रात सांगण्यात आलं आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. गुजरातमधील गुप्तचर यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी माहिती दिली आहे. यामध्ये रेल्वे स्थानकं, मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला टार्गेट केलं जाऊ शकतं. गुप्तचर यंत्रणांनी हा हल्ला हैद्राबादमधील व्यक्ती करणार असल्याचंही सांगितलं आहे. हा दहशतवादी पुलवामा हल्ल्यातही सहभागी होता. कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आरपीएफ जवानांनी राज्य पोलीस आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आलं आहे. सर्व सुरक्षा विभागांना संवेदनशील स्थानकांची यादी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -