घरमुंबईसापाच्या विषावर जालीम उतारा, मुंबई विद्यापीठाचे संशोधन

सापाच्या विषावर जालीम उतारा, मुंबई विद्यापीठाचे संशोधन

Subscribe

विद्यापीठाच्या जीवभौतिकशास्त्र विभागाने केलेल्या संशोधनात सापाच्या विषाची तीव्रता कमी करण्यात यश मिळविले आहे. महत्वाचे म्हणजे ही तीव्रता शून्यावर आणण्यासाठी संशोधन सुरू आहे.

मुंबईसह राज्यात सर्पदंशाच्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर प्रभावी औषध शोधण्यासाठी राज्यातील विविध संस्थांमध्ये संशोधन सुरू आहे. या प्रक्रियेत आता मुंबई विद्यापीठाने एक नवे संशोधन करुन अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विद्यापीठाच्या जीवभौतिकशास्त्र विभागाने केलेल्या संशोधनात सापाच्या विषाची तीव्रता कमी करण्यात यश मिळविले आहे. महत्वाचे म्हणजे ही तीव्रता शून्यावर आणण्यासाठी संशोधन सुरू आहे.

या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी विभागाने चांदीच्या धातूचे नॅनो कण तयार केले. त्याचे गुणधर्म तपासून पाहिले. त्यांचा उपयोग करून संशोधनासाठी प्राथमिक चाचण्या केल्या. त्याचे परिणामही उत्कृष्ट आले. या चाचण्या यशस्वी करण्यासाठी जैवभौतिक तंत्राचा उपयोग करण्यात आला. त्या नॅनो कणांनी विविध चाचण्यांद्वारे सापाच्या विषाची तीव्रता जवळ ९५-९८ टक्के एवढी कमी झाली असे दिसून आले.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या जीवभौतिकशास्त्र विभागाने केलेल्या या संशोधनाने सध्या जगाचे लक्ष वेधले आहे. सध्या हे संशोधन जपानमधील जीवभौतिक शास्त्र या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. टॉक्सिकॉन या संशोधन नियंतकालिकेमध्येही प्रसिद्ध झाले आहे. विभाग प्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे हे या प्रकल्पावर काम करीत आहेत. त्यांना वृषाली हिंगणे आणि धनश्री पंगम या विद्यार्थीनी सहकार्य करीत आहेत. सापाचे विष, त्याचे दुष्परिणाम व योग्य उपचार पद्धती याविषयी फारसे संशोधन झालेले नसल्यामुळे या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

जगभरात विशेषत: उष्णकटिबंधीय प्रदेशात साप चावून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: ग्रामीण भागामध्ये साप चावून मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात दरवर्षी ५२ हजार लोक साप चावून मरतात. साप चावल्यानंतर त्याचे विष संपूर्ण अंगात पटकन पसरते. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रांमध्ये ठोस उपाय नाही. सापाचे विष मुख्यतः मेंदू, हृदय, स्नायू आणि रक्ताभिसरण संस्थांना निकामी करते, त्यामुळे मृत्यू ओढवतो.

- Advertisement -

साप चावलेल्या माणसाला सापाच्या विरुद्ध काम करणारे परमाणू (अँटीबॅाडीज- प्रतिजैविक/anti snake venom) घोड्यापासून तयार करण्यात येतात. ही प्रतिजैविके घोड्याच्या रक्तामधून वेगळी केली जातात. ते साप चावलेल्या रोग्यास देण्यात येतात. परंतु काही वेळेस या प्रतिजैविकांची त्या रोग्यावर उलट क्रिया (रिअ‍ॅक्शन) होते. रोगी अधिक गंभीर होऊन त्याचा मृत्यूसुद्धा ओढावतो.

त्यामुळे कायम स्वरुपी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी विभागाने हे संशोधन हाती घेतले, असे विभागप्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे यांनी सांगितले. या महत्वपूर्ण विषयावर मागील पाच वर्षापासून संशोधन सुरू आहे. गेल्या पाच वर्षातील संशोधनातून जे प्राथमिक निष्कर्ष हाती आले ते खूपच विश्वसनीय आणि आशादायक आहेत. पुढील चाचण्या प्राण्यांवर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -