घरमुंबई२०१८ सालात रेल्वेमध्ये ३९ हजार गुन्ह्यांची नोंद

२०१८ सालात रेल्वेमध्ये ३९ हजार गुन्ह्यांची नोंद

Subscribe

रेल्वेतील गुन्ह्यांच्या संख्येत प्रचंड वाढ

मुंबईतील रेल्वे उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये दिवसेंदिवस विविध गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मागील तीन वर्षांत गुन्हे झपाट्याने वाढले आहेत. रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तरीही मोबाईल चोरी, पाकीट चोरी, बॅग चोरी यांसह इतर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. २०१६ सालापर्यंत रेल्वेमध्ये ३ हजार ३०७ गुन्हे नोंद होते, २०१८ मध्ये मात्र तब्बल ३९ हजार ३१६ गुन्ह्यांची नोंद झाली.

याआधी रेल्वे पोलीस मोबाईल आणि पाकीट चोरीच्या तक्रारी नोंदवत नसत, केवळ त्यांची नोंद होत असत. मात्र, रेल्वे पोलीस आयुक्तपदी निकेत कौशिक येताच त्यांनी अशाही तक्रारी ‘तक्रार’ म्हणून नोंदवून घेताना चोरीचा गुन्हा दाखल केला जावा, असे आदेश दिले. त्यानुसार भा.दं.वि कलम ३५६ नुसार चोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे रेल्वेच्या गुन्ह्यांमध्ये आकस्मात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

२०१६ सालापर्यंत दाखल होत असलेल्या गुन्ह्यांची सरासरी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१६ साली वेगवेगळ्या प्रकारचे असे ३ हजार ३०७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१७ साली त्या गुन्ह्यांची संख्या २५ हजार ४१६ इतकी होती. २०१७ साली हा आकडा ८० टक्क्यांनी वाढला होता. दिवसेंदिवस रेल्वे प्रवासात असंख्य गुन्हे घडत असल्यामुळे अजूनही हा आकडा वाढत चालला आहे. २०१८ सालात गुन्ह्यांची संख्या ३९ हजार ३१६ इतकी वाढली. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक मोबाईल चोरीच्या तक्रारींचा समावेश आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील या तक्रारी असून पोलीस या प्रकरणांचा तपास करण्यात व्यस्त आहेत.

२०१६ सालापासून सर्व प्रकारच्या चोरीच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळेच या गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हे वाढले म्हणण्यापेक्षा त्यांचा तपास योग्यपद्धतीने कसा करता येईल याकडे आमचे लक्ष असते.
– निकेत कौशिक, लोहमार्ग पोलीस आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -