घरमुंबईदहिसरमधील कोकणीपाड्यात ‘दुष्काळ’

दहिसरमधील कोकणीपाड्यात ‘दुष्काळ’

Subscribe

दिवसाआड मिळते एक हंडा पाणी , पाण्यासाठी अर्धा किलोमीटरपर्यंत होते पायपीट

मुंबईकरांना 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणार्‍या सत्ताधारी शिवसेनेला जनतेला साधे 24 मिनिटेही पाणी देता येत नाही. सत्ताधारी शिवसेना पक्ष आणि महापालिकेला मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात अपयश येत आहे. दहिसर पूर्व मधील कोकणीपाडा परिसरातील अष्टविनायक नगरातील रहिवासी पिण्याचे एक ते दोन हंडे मिळविण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. या भागात अपुर्‍या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांच्या भांड्यात एक दिवसाआड पाणी जमा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी अर्धा किलोमीटरपर्यंत रहिवाशांना पायपीट करावी लागत आहे. या भागातील रहिवाशांना मुंबई शहरात असूनही दुष्काळी ग्रामीण भागात राहत असल्याची वेदना होत आहे.

मुंबईत पाणीकपात लागू झाल्यानंतर सर्वत्रच पाण्याच्या नावाने बोंबाबोंब सुरू झाली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये कमी दाबाने येणार्‍या अपुर्‍या पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवक आपल्या भागातील लोकांच्या समस्या मांडत आहेत. पण प्रशासन तेवढ्या गंभीरतेने घेत नाही. मुंबईच्या टोकाला असलेल्या पश्चिम उपनगरातील दहिसरमधील कोकणीपाडा परिसरातील अष्टविनायक नगरातील लोकांची पाण्याची समस्या मागील 35 ते 36 वर्षांपासून कायम आहे.

- Advertisement -

अष्टविनायक नगरात सुमारे दोन हजारांच्या घरात कुटुंबे आहेत. परंतु, या कुटुंबांना आजही पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दरमजल करावी लागत आहे. पिण्याव्यतिरिक्त इतर वापराच्या पाण्यासाठी बोअरवेल उपलब्ध आहेत. परंतु, पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी बाया बापड्यांना रस्ता ओलांडून अर्धा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडा आणि कळशी घेऊन टेकडीवर चढत कुटुंबाची पाण्याची तहान भागवावी लागत आहे. मात्र, एवढ्या वर्षानंतरही पाण्याचा एक थेंब वाढलेला नाही. मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचे आश्वासन दिले जाते. पण, या भागातील नागरिकांना 24 तास नको तर 20 मिनिटे जरी पाणी मिळाले तरी चालेल एवढीच माफक अपेक्षा येथील रहिवासी करत आहेत.

या भागात मागील 36 ते 37 वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. सुमारे 700 मीटर अंतरावरून आम्ही डोक्यावर हंडा, कळशी भरून पाणी आणत आहोत. जे पाणी मिळते तेही दिवसाआड. या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीसमस्या आमच्या पाचवीला पुजलेली आहे. प्रशासनाने किमान आमच्या भागातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे.
– पूर्वा महाडिक, रहिवासी

- Advertisement -

आम्ही मुंबईत राहतो की गावाकुसाला हाच प्रश्न आम्हाला पडतो. कारण मुंबईत राहत असून एक दिवसाआड आम्हाला पाणी मिळते. आम्ही उंचावर राहत असल्याने पाणीपुरवठा योग्य होत नसल्याचे अधिकारी सांगतात. परंतु, ज्या टाकीतून पाण्याचा पुरवठा या भागाला होतो तीच मुळात पुरेशी पाणीसाठ्याची नाही. त्यामुळे समस्या कायम आहे. स्थानिक नगरसेवक आमच्यासाठी प्रयत्न करत असले तरी प्रशासन काही दाद देताना दिसत नाही.
– प्रिया धुरी, रहिवासी

अष्टविनायक नगरमधील रहिवाशांना आजही एक ते दोन हंडेच पिण्याचे पाणी मिळत आहे. हे पाणी त्यांना अर्धा किलोमीटर अंतरावरून आणावे लागते. या भागातील पाण्याची समस्या विचारात घेता याठिकाणी बुस्टर पंप लावून टाकीतून जास्तीत जास्त पाणी येथील रहिवाशांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या भागात बोअरवेल असल्याने धुण्याभांड्यासाठी त्यातील पाणी वापरले जाते. त्यामुळे अजून एक बोअरवेल बांधून पिण्याव्यतिरिक्त इतर वापराचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
– संजय घाडी, स्थानिक नगरसेवक

हा परिसर टेकडीवर असल्याने कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होतो. सध्या पाणीकपात असल्याने पाण्याची पातळी योग्यप्रकारे राखली जात नाही. परिणामी टेकड्यांवर योग्यदाबाने पाणीपुरवठा होत नाही. या समस्येवर अनेकदा जलअभियंता विभागासोबत बैठका झाल्या आहेत. पण त्यावर तोडगा निघत नाही. तरीही अनेक शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
– संध्या नांदेडकर, सहायक आयुक्त, आर/उत्तर विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -