घरमुंबईग्रामीण भागातही बाईक अ‍ॅम्बुलन्सने वाचवले हजारोंचे प्राण

ग्रामीण भागातही बाईक अ‍ॅम्बुलन्सने वाचवले हजारोंचे प्राण

Subscribe

मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्यांतून, अरुंद रस्त्यांतून रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे बाईक अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा सुरू करण्यात आली. तशीच सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना उपलब्ध व्हावी, यासाठी ऑगस्टपासून पालघर, गडचिरोली, अमरावती आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्येही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत या चारही जिल्ह्यांमध्ये बाईक अ‍ॅम्ब्युलन्समुळे हजारो रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे शक्य झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम भागासाठी पंढरपूरमधील सोलापूर परिसरात तसेच गडचिरोलीतील मेळघाटात आणि अमरावतीतील नक्षल भागात या बाईक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. रहदारीच्या आणि दुर्गम भागात तातडीने रूग्णसेवा मिळण्यासाठी याचा फायदा येथील रूग्णांना होत आहे.

आरोग्य विभागातील आपत्कालीन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये सहा महिन्यांपूर्वी ५ बाईक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३५० ते ४०० रुग्णांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा फायदा झाला आहे. त्यापाठोपाठ, सोलापूरमध्ये ४०० रुग्णांना या बाईक अ‍ॅम्ब्युलन्सचा फायदा झाला आहे. अमरावतीत जवळपास १०० रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर, गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात ६० रुग्णांवर उपचार झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जवळपास एक हजार रुग्णांना बाईक अ‍ॅम्ब्युलन्समुळे वेळेवर उपचार मिळू शकले आहेत.

- Advertisement -

‘१०८’ ने चार वर्षात वाचवले ३३ लाख रुग्णांचे प्राण

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील आपत्कालीन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, १०८ या अ‍ॅम्ब्युलन्सने जानेवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत या चार वर्षांमध्ये ३३ लाख ६८ हजार ३७५ रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. राज्यात महाराष्ट्र शासनाच्या १०८ नंबरच्या एकूण ९३७ अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. ज्याचा फायदा संपूर्ण राज्यभर होत आहे. त्यासोबतच अडीच हजार डॉक्टर्स असून तीन शिफ्टमध्ये काम केलं जातं. ९३७ पैकी २४९ या अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. ज्याचा फायदा हार्ट अ‍ॅटॅक आलेल्या आणि त्याला गोल्डन मिनिटमध्ये उपचार मिळावेत यासाठी केला जातो. अशा प्रकारे किमान वर्षाला १२ लाख रुग्णांना १०८ चा फायदा होतो.

पूर्णपणे पारदर्शक सेवा 

‘१०८’ ही सेवा रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत असून अत्यंत पारदर्शक आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात एखादी आपत्कालीन परिस्थितीत ओढावली तर, कोणती अ‍ॅम्ब्युलन्स कुठे आहे ? अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर कोण आहे ? कसली इमर्जन्सी आहे ? या सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवला जातो. त्यामुळे, एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणचाही व्यवस्थित ट्रॅक ठेवला जातो.

- Advertisement -

या कारणांसाठी सर्वात जास्त गरज –

गेल्या साडेचार वर्षात वाहन अपघात, मोठे अपघात, दुखापती, मारहाण, उंचावरून पडणे, भाजणे, हृदयविकाराचा झटका, विषबाधा, गर्भवती प्रसूती, विद्युत झटका अशा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत १०८ रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचली आहे. रुग्णवाहिकेत २४ तास प्रशिक्षित डॉक्टर आणि चालक असतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले

अशी मिळेल आपल्याला अ‍ॅम्ब्युलन्स

१०८ क्रमांकावर प्रथम फोन केल्यावर हा कॉल अ‍ॅम्ब्युलन्स आणि बाईक अ‍ॅम्ब्युलन्स दोघांना कॉलसेंटरद्वारे फोन जातील. तेथून अपघाताची किंवा अत्यावश्यक उपचाराकरीता रूग्णांची माहिती आपल्याला द्यावी लागेल. त्यानुसार २५ ते ३० किलोमीटरदरम्यान रूग्णाला किती तातडीने उपचार देणे आहे, फोनवर दिलेल्या माहितीवरून डॉक्टरांना कळवले जाते. त्यानुसार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन उपलब्ध बी. ए. एम.एस. डॉक्टर थेट रूग्ण असलेल्या ठिकाणावर पोहोचतील आणि प्रथमोपचार केल्यानंतर मागून येणार्‍या रूग्णवाहिकेसोबत पुढील उपचाराकरीता शासकीय रूग्णालयात दाखल करतील.

गर्भवती महिलांना होणारा त्रास, प्रसूती यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा खूप फायदा होत आहे. मागील चार वर्षात ८ लाख २४ हजार ४६१ गर्भवती महिलांना सेवा देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ ३ लाख २८ हजार ५५० रुग्णांना विविध अपघातांच्या ठिकाणी सेवा देण्यात आली.

आपत्कालीन स्थितीत सेवा (जानेवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत)
वैद्यकीय – १६,१५, २०७
गर्भवती महिला -८,२४,४६१
वाहन अपघात – २,९१,६८५
विषबाधा – १, १८, ८७३
इतर – ३,२८,५५०
कार्डिअ‍ॅक – १, ११,५५
प्रसूती – २८, ९८५

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -