घरमुंबईमोबाईल चोराला पकडण्यासाठी धावत्या लोकलमधून मारली उडी

मोबाईल चोराला पकडण्यासाठी धावत्या लोकलमधून मारली उडी

Subscribe

प्रवासी बेशुद्ध, उपचारासाठी लाखो रुपये खर्च

मुंबई:-लोकलच्या डब्यात एक प्रवासी मोबाईलवरून चॅट करत असताना त्याच्याकडील मोबाईल चोरट्याने रेल्वे स्थानकावरून गाडी चालू होताच हिसकावून पळ काढला. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच चोरट्याने धावत्या लोकलमधून उडी मारली. त्याच्या पाठोपाठ प्रवाशानेही उडी मारली, मात्र त्यावेळी प्रवाशाला गंभीर दुखापत झाली, तो प्रवाशी जागीच बेशुद्ध पडला. पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत. या घटनेची जबाबदारी अद्याप रेल्वेने घेतली नसल्याने प्रवाशाच्या कुटुंबियांना लाखो रुपये वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावे लागत आहेत.

सचिंद्र कुमार सिंग असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. सचिंद्र यांनी २ नोव्हेंबर २०१८ रोजी कुर्ला रेल्वे स्थानकातून पनवेलकडे जाण्यासाठी लोकल पकडली. त्यानंतर सचिंद्र मोबाईलवर चॅटिंग करण्यात दंग झाले. जेव्हा गाडी बेलापूर रेल्वे स्टेशन येथे थांबून चालू झाली, तेव्हाच डब्यातून प्रवास करणार्‍या एका अनोळखी व्यक्तीने सचिंद्र यांचा हातातील मोबाईल हिसकावून धावत्या लोकलमधून उडी मारून पळ काढला. तेव्हा सचिंद्र चोर-चोर असे ओरडत त्यांनीही धावत्या लोकलमधून उडी मारली. मात्र ते खाली पडले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. पोलिसांनी ताबडतोब सचिंद्र यांना एम.जी.एम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. गाडीतील साक्षीदार प्रवासी यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारावर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचिंद्र मात्र अद्याप शुद्धीवर आलेले नसल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisement -

रेल्वे पोलिसांचा कातडी बचाव

घटनेच्या पहिल्याच दिवशी जेव्हा पोलिसांनी सचिंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा या घटनेबाबत जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांना विचारले असता त्यांनी सचिंद्र झोपेत होते,स्टेशन आले म्हणून घाईत उतरताना खाली पडले, असे सांगितले. या माहितीवर सचिंद्रच्या कुटुंबियांना विश्वास बसला नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचे सांगण्यात आले. ३ दिवसांनंतर मात्र रेल्वे स्थानकावरचे फुटेज मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यात सचिंद्र यांचा मोबाईल चोराने चोरला, त्याचा पाठलाग करताना ते पडल्याचे दिसले. आता या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस मोबाईल चोराचा शोध घेत आहेत. यासंबंधी पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संपर्क केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

सचिंद्र कोमात, सात लाख खर्च

सचिंद्र मागील आठ दिवसांपासून आयसीयूमध्ये असून ते कोमात आहेत.आतापर्यंत त्यांच्या कुटूंबियांना ७ लाख खर्च आला आहे. सचिंद्र यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ते कोमातून केव्हा बाहेर येणार याबद्दल सांगता येत नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

माझा भाऊ आठ दिवसांपासून आयसीयूमध्ये असून तो कोमात गेला आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. कारण आज माझ्या भावाबरोबर जी घटना घडली ती भविष्यात कोणाबरोबरही घडू शकते.
– गजेंद्र कुमार सिंग, (सचिंद्र यांचा भाऊ)

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -