घरमुंबईसेनेच्या ड्रिम प्रोजेक्टविरोधात कोळीबांधव एकवटले

सेनेच्या ड्रिम प्रोजेक्टविरोधात कोळीबांधव एकवटले

Subscribe

सक्ती करू दिली जाणार नाही - राज ठाकरे

सुमारे साडे पस्तीस किलोमीटरचा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प शिवसेनेसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसाठी ड्रिम प्रोजेक्ट म्हणून हाती घेतला जात असला तरी मूळ मुंबईकर कोळी बांधव या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची नाराजी पत्करून हा प्रकल्प राबवावा लागणार असल्याने ती सेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. हा विषय आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हाती घेतल्याने सेनेसाठी तीही एक अडचण झाली आहे.

या प्रकल्पाचे रविवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे मुंबईच्या किनारपट्टीला असलेला कोळी समाज उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने मूळ मुंबईकर असलेला हा शिवसेनेचा मतदार या ड्रीमप्रोजेक्टमुळे सेनेपासून दूर जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांनी सेनेच्या नेत्यांच्या भेटी घेऊन प्रकल्प होऊ नये म्हणून विनवण्या केल्या. मात्र याबाबत सेनेच्या एकाही नेत्याने साधी चर्चाही घडवून आणली नसल्याची बाब कोळी समाजाच्या नाराजीचे कारण ठरली आहे. सेनेने दुर्लक्ष केल्याने कोळी समाजातील काही मान्यवरांनी हे प्रकरण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवले. राज यांनी या भेटीत कोळी बांधवांना अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. शिवाय महानगरपालिकेला हा प्रकल्प सक्तीने राबवू देणार नाही, असेही सांगितले.

- Advertisement -

प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली दरम्यानच्या या प्रकल्पासाठी किनारपट्टीवर भराव केला जाणार आहे. याशिवाय खाड्यांवर पूल आणि बोगदे अशा प्रकारे या कोस्टलरोडची उभारणी होणार आहे. वरळी ते बांद्रा सिलिंकचा वापर या कोस्टलसाठी केला जाणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यांमधल्या होड्यांची समुद्रातील ये-जा रोखली जाणार असल्याची भीती कोळी बांधवांनी राज यांच्या भेटीत व्यक्त केली. या भेटीत कोस्टल रोडच्या पिलरमधील अंतर २०० मीटरहून कमी नसावे, किनार्‍यावरील मासे सुकवण्याच्या जागा राखून ठेवणे, माऊंटमेरी ते बाणगंगा दरम्यानच्या मासेमारीच्या जागा राखून ठेवणे, वादळात होड्या सुरक्षित ठेवणार्‍या लोटस जेटीचे संरक्षण करणे, वरळी ते प्रियदर्शनी दरम्यान समुद्रात भराव टाकण्यात येणार असल्याने कोळीवाडे पाण्यात जाण्याची भीती दूर करणे, परंपरागत मासेमारी करणार्‍या कोळी बांधवांना नुकसान भरपाई देणे अशा मागण्या कोळी बांधवांनी राज यांच्या भेटीत केल्या. या भेटीनंतर राज ठाकरे स्वत: कोळी बांधवांसह वरळी किनारी गेले. तिथे त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली. मुंबईतील कोळी बांधवांना उद्ध्वस्त होऊ दिले जाणार नाही, अशा शब्दात त्यांना आश्वस्त केले.

शिवसेना-भाजपच्या राजकीय भांडणात या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेनेने रविवारी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उरकून घेतले. यामुळे कोळी बांधवांचा वाढता रोष शिवसेनेवर ओढवला आहे. सेना नेत्यांकडून न्याय मिळू न शकल्याने मनसेची मदत घेण्याचा कोळी बांधवांनी केलेला प्रयत्न सेनेच्या अडचणी वाढवणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे राज यांनी कोळी बांधवांना विश्वास दिल्याने या पारंपरिक कोळ्यांना आपलेसे कसे करायचे असा पेच सेनेपुढे निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -