घरमुंबईसंस्कृती जपण्यासाठी भाषेची जपणूक आवश्यक

संस्कृती जपण्यासाठी भाषेची जपणूक आवश्यक

Subscribe

 देवेंद्र फडणवीस यांचे मत

भाषा ही केवळ भाषा नसते, तो संस्कृतीचा आरसा असतो. भाषा जपली तर संस्कृतीवर कुणीही आक्रमण करू शकत नाही, म्हणूनच भाषेचे जपण्याचे महत्त्व हे फार मोठे आहे,असे प्रतिपादन करतानाच अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना व्हावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत केली.

रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आपल्या सरकारच्या काळात समिती स्थापन करण्यात आली होती. त्याच्या अहवालावर या सरकारने उचित कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातील कायद्यावर ते विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले की, मराठी ही देशात तिसरी आणि जगात दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. या भाषेच्या समृद्धीत अनेकांनी मोठे योगदान दिले. 1924 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचा स्तंभ केसरी या दैनिकातून सुरू केला. कितीतरी मोठी शब्दसंपदा त्यांनी मराठी भाषेला दिली. मराठी भाषेवरील अन्य भाषिक अतिक्रमण दूर करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केले. आज देशातील एकूण ग्रंथालयांपैकी 25 टक्के ग्रंथालये ही महाराष्ट्रात आहेत. मराठीला विपुल ग्रंथसंपदा लाभलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी गेल्या 5 वर्षांत मोठे प्रयत्न झाले. दरम्यानच्या काळात काही न्यायिक अडचणी होत्या. आता त्या याचिका खारिज झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या समितीतील 2 पदे रिक्त होती. तीही आता भरण्यात आली आहेत.त्यामुळे आता या प्रक्रियेला गती देण्याची हीच खरी वेळ आहे.

- Advertisement -

प्रचंड मोठ्या प्रमाणात संतसाहित्य उपलब्ध असण्याचा मान केवळ मराठी भाषेलाच आहे. पण, आता येणार्‍या काळात मराठी ही माहिती-तंत्रज्ञानाची सुद्धा भाषा झाली पाहिजे. ती ज्ञानभाषा व्हावी, याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल.मूल्याधिष्ठीत व्यवसायात मराठीची सुप्रतिष्ठा करावी लागेल.आज आपण मराठी सक्तीचा कायदा करतो आहोत, ही आनंदाची बाब आहे.पण,तो अंमलात आणण्याची सक्षम व्यवस्था उभी करावी लागेल,हे अधिक महत्त्वाचे आहे. मराठी सक्तीच्या कायद्यात पळवाट राहू नये.आहे त्या स्वरूपात या कायद्याला मंजुरी देण्याची आमची तयारी आहे.पण,त्यामुळे तो कसोशीने अंमलात येईल काय,ही शंका आहे. यातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी. चांगले उपकरण तयार झाले तरच या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी शक्य आहे. त्याची काळजी सरकारने घ्यावी,अशा सूचनाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -