घरमुंबईतानसाच्या जंगलातून बिबटे पसार

तानसाच्या जंगलातून बिबटे पसार

Subscribe

मानवी अतिक्रमणे, पाण्याच्या कमतरतेचा परिणाम

तानसा अभयारण्यातील घनदाट जंगलात संचार करणार्‍या वन्यप्राण्यांचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. अभयारण्यातील जंगलात मानवी वस्त्यांचे वाढते अतिक्रमण, वाहनांचे आवाज, उन्हाळ्यात पेटविले जाणारे वणवे पाण्याची प्रचंड टंचाई, छुप्या पद्धतीने होणारी शिकार, लाकूडचोर टोळ्यांकडून नष्ट होत असलेले जंगल, या आणि अशा अनेक समस्यांमुळे तानसाच्या जंगलातील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दरवर्षी वन्यप्राण्यांची संख्या तानसा अभयारण्यात कमालीची रोडावत आहे. शिकार व पाण्याच्या शोधात भटकंती करीत बिबट्याने तर तानसाच्या जंगलाकडे पाठ फिरवीत अन्य ठिकाणी जंगलात स्थलांतर केले काय ? अशी भीती व्यक्त होत आहे. शहापूर वनविभागाच्या तानसा वन्यजीव विभाग आणि प्रादेशिक विभागाच्या जंगलात बिबट्याच्या पाऊलखुणा गेल्या दोन वर्षांपासून वन्यप्राणी सर्वेक्षणात आढळूनच येत नसल्याने तानसाच्या जंगलास बिबट्यांचे अस्तित्व राहिले नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील 320 चौरस किलोमीटर असे तानसा अभयारण्याचे जंगल क्षेत्र आहे. तर प्रादेशिक वनविभागाचे 60 हजार हेक्टर क्षेत्र असे विस्तीर्ण जंगल आहे. वनविभागाच्या या जंगलात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी असल्याचा दावा वन्यजीव विभाग करीत आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे वन्यजीव विभागाच्या दफ्तरीगेल्या दोन वर्षांपासून केलेल्या वन्यप्राणी सर्वेक्षणाच्या नोंदी पाहता समोर येत आहे. वन्यजीव विभागाने तानसा अभयारण्यातील 40 पाणवठ्यांवर केलेल्या सर्वेक्षणात तानसा, वैतरणा, खर्डी, परळी, सूर्यमाळ या वनक्षेत्रातील दाट जंगलात एकूण भेकर 52, ससे 52, मोर 34, तरस 2, डुक्कर 84, चितळ 20, वानर 2, माकड 12, खार 5 आणि इतरपक्षी 98 असे एकूण 361 वन्यजीवांच्या पाऊलखुणा आढळून आल्याच्या वन्यजीव विभागाकडे नोंदी आहेत. मात्र धक्कादायक म्हणजे वन्यप्राणी सर्वेक्षणात तानसाच्या जंगलात बिबट्या अथवा एखाद्या वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याची नोंदच वन्यजीव विभागाकडे दिसत नसल्याने तानसाच्या जंगलात आता बिबटे उरले आहेत की नाहीत, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

- Advertisement -

बिबटे जंगलातून का हद्दपार झाले असावेत, याबाबत शहापूर वनविभाच्या एका वनअधिकार्‍यास विचारले असता या वन अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की जंगलात मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकांचे अतिक्रमण झाले आहे. विशेषतः तानसात ही अतिक्रमणे वाढल्याने जंगलातील निरव शांतता भंग होत आहे. वन्यप्राण्यांच्या जंगलात मानवाचा वावर वाढला आहे. तसेच काही शिकार्‍यांकडून जंगलातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणावर वणवे पेटविले जातात. त्यात लहान सहान वन्यजीव शिकार्‍यांकडून लक्ष्य होतात. तसेच जंगलातील वणव्यात जंगल होरपळून उध्वस्त होते. या आणि अशा कारणांमुळे वन्यप्राणी कमी होत आहेत. त्यामुळे बिबट्यांना शिकार मिळत नाही. त्यामुळे ते एका ठिकाणी न थांबता येथून दुसरीकडे स्थलांतरीत झाले असावेत. सध्या मुरबाड माळशेज घाटातील जंगलात आढळून येणारे बिबटे हे स्थानिक नसून ते जुन्नर व नाशिक या भागातील जंगलातील स्थलांतरीतच असावेत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -